एसटीचे कर्मचारी चोर आणि स्वार्थीः ‘वंचित’चे नेते प्रकाश आंबेडकर यांचा गंभीर आरोप

यवतमाळः राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीचे कर्मचारी चोर आणि स्वार्थी आहेत, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ हवी आहे. मात्र ते एसटीच्या चोरीवर गप्प आहेत. ते बोलत नाहीत, म्हणजेच ते या लुटीत सहभागी आहेत. ते चोर आहेत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

 प्रकाश आंबेडकर हे शुक्रवारी यवतमाळमध्ये आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवर हा गंभीर आरोप केला आहे. एसटीचे कर्मचारी स्वार्थी आहेत. ते केवळ स्वतःच्या पगाराचा विचार करतात. ते एसटीच्या लुटीवर बोलत नाहीत. ते या लुटीवर बोलत नसतील तर तेही या लुटीत सहभागी आहेत, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

 सध्या राज्यात अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची चर्चा आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार असा प्रश्न पत्रकारांनी प्रकाश आंबेडकरांना विचारला असता ते म्हणाले की, आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत. ही निवडणूक शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी महत्वाची आहे, असे मला वाटते. या निवडणुकीत भाजपचा उमेदवार आहे. त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही. वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रेखा ठाकूर यांनी काँग्रेस किंवा शिवसेनेबरोबर युतीचा प्रस्ताव आल्यास विचार करू अशी भूमिका मांडली. त्या भूमिकेला कोणीही प्रतिसाद दिला नाही. आम्हाला कोणीही पाठिंबा मागितला नाही, त्यामुळे आम्ही कोणतीही भूमिका घेतली नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

भाजपला एकनाथ शिंदेही नकोतः भाजपला एकनाथ शिंदेही नको आहेत. त्यांना जसे उद्धव ठाकरे नको होते, तसेच एकनाथ शिंदेही नको आहेत. हे ओझेही त्यांना उतरवायचे आहे. भाजपला परिस्थिती त्यांच्या बाजूने दिसली तर ते निवडणुका घेणे पसंत करतील, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या गटाची आणि भाजपची युती होते का, हे पहावे लागेल, असे आंबेडकर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!