प्रकाश आंबेडकर- एकनाथ शिंदे यांच्यात अडीचतास खलबते, राजकीय चर्चांना उधाण

मुंबईः वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युती होऊन महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन समीकरणाची नांदी घातली जाण्याची चर्चा सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या दोन नेत्यांमध्ये बुधवारी रात्री जवळपास अडीचतास खलवते सुरू होती, अशी माहिती समोर आली आहे. या दोघांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील बाहेर आला नसला तरी या दोन नेत्यांची भेट चर्चेचा विषय ठरली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी प्रकाश आंबेडकर हे बुधवारी रात्री वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी गेले होते. या दोन नेत्यांमध्ये बंद दाराआड सुमारे अडीचतास चर्चा झाली. या दोघांच्या भेटीत नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याबाबत दोघांकडून काहीही सांगण्यात आले नसले तरी प्रकाश आंबेडकर हे आता शिंदे गटासोबत जाण्याबाबत चाचपणी करत आहेत का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

राजकीय अर्थ काढू नकाः प्रकाश आंबेडकर आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीबाबत वंचित बहुजन आघाडी आणि शिंदे गट या दोघांकडूनही दुजोरा देण्यात आला आहे. प्रकाश आंबेडकरांची मुख्यमंत्र्यांसोबत झालेली भेट ही इंदू मिल संदर्भात होती. या भेटीचे कोणतेही राजकीय अर्थ काढू नये, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना दिली.

 ही गुप्त भेट नव्हेः प्रकाश आंबेडकर आणि एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या भेटीला गुप्त बैठक म्हणता येणार नाही. कारण ही बैठक वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी झाली आहे. सर्व पक्षांना सोबत घेऊन महाराष्ट्राचा विकास करावा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे धोरण आहे, असे शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे.

धक्कातंत्राचा भाग?:  गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे गटाच्या विरोधात धक्कातंत्राचा वापर केला जात आहे. ही भेटही त्याच धक्कातंत्राचा भाग आहे का? असे विचारले असता उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात भेट झाली, तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना विरोध केला होता. शेवटी महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने काही पावले उचलणे गरजेचे आहे. सर्वांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे. विरोधाला विरोध न करता चांगल्या कामांसाठी एकमेकांना पाठिंबा देणे आवश्यक आहे, असेही म्हस्के म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!