येत्या १५ दिवसांत दोन राजकीय भूकंप होणार, एक महाराष्ट्रात आणि दुसऱा दिल्लीतः खा. सुप्रिया सुळेंचा मोठा दावा

नवी दिल्लीः  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याकडे ४० आमदारांच्या सह्यांचे पत्र तयार असून ते लवकरच भाजपसोबत जाऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले पहायला मिळू शकतात. त्यामुळे महाराष्ट्रात लवकरच राजकीय नाट्याचा दुसरा अंक पहायला मिळेल, अशा राजकीय चर्चांना  उधाण आलेले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यानीं मोठा दावा केला आहे. येत्या पंधरा दिवसात दोन राजकीय भूकंप होणार आहेत. एक दिल्लीत आणि दुसरा महाराष्ट्रात, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

 महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे. या निकाल काय असेल, याचे अंदाज बांधत त्यावरून राजकीय आडाखे आखले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदेंसह शिवसेनेतून फुटलेले १६ आमदार अपात्र ठरवल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून भाजपकडून अजित पवारांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याच्याही चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत.

या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर येत्या पंधरा दिवसांत राज्यात राजकीय भूकंप होईल, असा दावा दोन दिवसांपूर्वीच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. त्याबाबत पत्रकारांनी विचारले असता एक नाही, दोन राजकीय भूकंप होणार. एक दिल्लीत आणि दुसरा महाराष्ट्रात, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. सुळे यांच्या या दाव्यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंपाचे अंदाज नव्याने वर्तवले जात आहेत.

अजित पवार कुठे आहेत? असे सुप्रिया सुळे यांना विचारले असता, तुम्ही त्यांच्या मागे जा, तुम्हाला समजेल ते कुठे आहेत. अनेक समस्या आहेत, राज्यात कामे होत नाहीत. त्यामुळे काही कार्यक्रम रद्द करून अजित पवार गेले होते. एक कार्यक्रम रद्द केल्याने काही होत नाही, असे सुळे म्हणाल्या.

अजित पवार भाजपमध्ये जाणार का?  असे विचारले असता माझ्याकडे गॉसिप्ससाठी वेळ नाही. एक लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडे खूप काम आहे. मला विषयीची काहीही माहिती नाही. अजितदादा हा मेहनत करणारा माणूस आहे. त्यामुळे त्याच्याविषयी चर्चा होत आहेत, असे खा. सुळे म्हणाल्या.

अजित पवार नाराज नाहीत. संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची सभा झाली. त्या ठिकाणी जयंत पाटलांचे भाषण झाले नाही. याचा अर्थ असा नाही की जयंत पाटील नाराज आहेत. नागपूरमध्ये वज्रमूठ सभेत राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांची भाषणे झाली. त्यामुळे अजित पवारांचे भाषण झाले नाही, असे खा. सुळे म्हणाल्या.  त्या ‘आजतक’शी बोलत होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!