काँग्रेस नेते राहुल गांधींना भारत जोडो यात्रेत बॉम्बने उडवून देण्याची धमकी

इंदूरः काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापले असतानाच राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा इंदूरमध्ये दाखल होण्याच्या आधीच त्यांना जीवे मारण्याची धमकी देणारी चिठ्ठी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये मिठाईच्या  दुकानाबाहेर हे पत्र आढळून आले आहे. हे पत्र आढळून आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. हे पत्र मिठाईच्या दुकानाबाहेर सोडून जाणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यास सुरूवात केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणारे हे पत्र शुक्रवारी सकाळी इंदूरमधील एका मिठाईच्या दुकानाबाहेर आढळून आले आहे. मिठाईच्या दुकानाबाहेर एक अज्ञात व्यक्ती हे पत्र सोडून गेली आहे.

 भारत जोडो यात्रा इंदूरमध्ये पोहोचल्यानंतर राहुल गांधी यांना बॉम्बने उडवून देण्यात येईल, असे या चिठ्ठीत म्हटले आहे. ही चिठ्ठी मिळाल्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात कलम ५०७ नुसार गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातून ही यात्रा मध्य प्रदेशात प्रवेश करणार आहे.

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा २४ नोव्हेंबरला इंदूरमध्ये पोहोचणार आहे. इंदूरच्या खालसा स्टेडियमवर रात्री ही भारत जोडो यात्रा विश्रांतीसाठी थांबणार आहे. पोलिसांनी हा खोडसाळपणाचा प्रकार असण्याची शक्यता वर्तवली आहे. तरीही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक ती खबरदारी घेत तपास सुरू करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!