तारीख पे तारीखः महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आता व्हॅलेंटाइन डेपासून सलग सुनावणी


नवी दिल्लीः महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागून असलेला आणि गेल्या सहा महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेला महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. नवीन वर्षात तरी या सत्तासंघर्षाच्या वादावर वेगाने सुनावणी होऊन काही तरी निकाल हाती लागेल, अशी अपेक्षा होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही सुनावणी १४ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली आहे. १४ फेब्रुवारीपासून उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यातील सत्तासंघर्षावर सलग सुनावणी घेतली जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे या सत्तासंघर्षाच्या निकालासाठी आणखी महिनाभर वाट पहावी लागणार आहे.

सरन्यायाधीश वाय.एस. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठासमोर आजची सुनावणी झाली. नबम रेबिया प्रकरणाचा हवाला देत ठाकरे गटाने हे प्रकरण सात सदस्यीय घटनापीठाकडे वर्ग करण्याची मागणी केली होती. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयात काय सुनावणी होते आणि सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु आजच्या सुनावणीला सुरू झाल्यानंतर काही मिनिटे युक्तीवाद झाला आणि सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात १४ फेब्रुवारीपासून सलग सुनावणी घेतली जाईल, असे सांगितले.

“हा निकाल पहिल्याच दिवशी लागू शकला असता. घटनाबाह्य कृती रोखणे हे सर्वोच्च न्यायालयाचे काम आहे. इतक्या मोठ्या खटल्यात तारखांवर तारखा पडत आहेत. घटनाबाह्य सरकार हे पाहून मिश्कीलपणे हसत आहे. त्यांना वाटतेय आमच्यावर कोणतीही कारवाई होऊ शकत नाही, महाशक्ती आमच्या पाठीशी आहे. पण आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्णपणे विश्वास आहे.”

संजय राऊत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार

१४ फेब्रुवारीचा दिवस हा व्हॅलेंटाइन डेचा दिवस आहे. त्यामुळे सर्वकाही प्रेमाने होऊन जाईल. १४ फेब्रुवारीपासून सलग सुनावणी घेतली जाणार आहे. आमचे घटनेवर प्रेम आहे. त्यामुळे कोर्टाने दिलेला निर्णय हा आम्हाला मान्य आहे. सात सदस्यीय घटनापीठ किंवा आत्ता असलेले पाच सदस्यीय घटनापीठ सलग सुनावणी घेणार असल्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. आज सुनावणी असल्यामुळे खा. संजय राऊत, खा. अनिल देसाई आणि आमदार  अनिल परब हे सर्वोच्च न्यायालयात हजर होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!