विषालाच ‘बासुंदी’चा दर्जा देण्याचा अचाट प्रयत्न, कटुता कशी संपणार?  शिवसेनेचा फडणवीसांना सवाल


मुंबईः  शिवसेनेतून जे विष बाहेर पडलेय, त्या विषालाच ‘बासुंदी’चा दर्जा देण्याचा सध्या जो अचाट प्रयत्न सुरू आहे, त्यामुळे कटुतेची धार कशी कमी होणार?, असा सवाल शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.  तुमच्या मनात आलेच आहे तर कटुता संपवण्याचा विडा उचलाच! कामाला लागा, असा सल्लाही फडणवीसांना देण्यात आला आहे.

 दिवाळीनिमित्त फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला व काही विषयांवर ते मोकळेपणाने बोलल्याचे प्रसिद्ध झाले. फडणवीस यांनी दोन महत्वाचे मुद्दे मांडले. त्यावर महाराष्ट्राने विचार करायला हवा. महाराष्ट्राच्या राजकारणात कधी नव्हे एवढी कटुता आली आहे, हे नाकारता येणार नाही, असे फडणवीस यांनी कबुल केले. महाराष्ट्राच्या राजकारणात फक्त कटुताच नव्हे तर सूडाच्या राजकारणाचे विषारी प्रवाह उसळत आहेत व त्या प्रवाहाचे मूळ भाजपच्या अलीकडच्या राजकारणात आहे. पण त्याबाबत फडणवीस यांच्यासारख्या नेत्यांना आता खंत वाटू लागली असेल तर त्या विषाचे अमृत करण्याचे कामही त्यांनाच करावे लागेल, असे शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.

राजकारणात व्यक्तिगत चिखलफेक करताना कोणतेही धरबंध आता बाळगले जात नाहीत व त्यासाठी भाजपने काही भुंकणाऱ्या कुत्र्यांना प्रशिक्षण दिले आहे. ते शरद पवारांपासून, ठाकऱ्यांपर्यंत ज्या भाषेचा वापर करतात त्यामुळे राज्याच्या राजकारणातील कटुता कशी कमी होईल?  तुम्ही केंद्रीय सत्तेचा गैरवापर करून सरकार पाडले. शिवसेना फोडलीत. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवले जावे यासाठी पडद्यामागून राजकीय सूत्रे हलवली गेली, हे सर्व महाराष्ट्राने आणि देशाने पाहिले. शिवसेना राहता कामा नये व शिवसेनेतून जे विष बाहेर पडलेय त्या विषाला ‘बासुंदी’चा दर्जा देण्याचा सध्या जो अचाट प्रयत्न सुरू आहे, त्यामुळे कटुतेची धार कशी कमी होणार? शिवसेनेतील काही लोक लाचार किंवा मिंधे केल्याने सत्ता मिळाली, पण महाराष्ट्राचे राजकीय वातावरण साफ नसल्याची जाणीव श्री. फडणवीस यांना झाली हे काय कमी झाले?,  असा खोचक टोलाही फडणवीस यांना लगावण्यात आला आहे.

 महाराष्ट्राचे (उप) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐनदिवाळीत सामोपचाराच्या, शहाणपणाच्या गोष्टी केल्या आहेत. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तेवढेच थोडेच. फडणवीस यांचा मूळ स्वभाव हा सामापचाराने मिळून मिसळून वागण्याचाच होता. पण सत्ता गेल्यामुळे ते बिघडले. सत्ता येते व जाते. माणसाने मूळ स्वभाव बदलण्याची गरज नाही. विजयानंतर आनंद होत असला तरी उन्माद चढणे हे प्रौढत्वाचे लक्षण मानले जात नाही. फडणवीस यांच्यात नव्या सत्तांतरापासून प्रौढपणा आला असल्याचे जाणवू लागले आहे, असेही शिवसेनेने म्हटले आहे.

महाराष्ट्रात कटुता का व कोणी निर्माण केली? महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षांत तीन सत्तांतरे झाली. त्यातील दोन सत्तांतरे थेट फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झाली आहेत. अजित पवार यांच्या मदतीने फडणवीस व त्यांच्या पक्षाने सत्तांतर करण्याचा प्रयत्न केला. तो फसला. त्यावेळीही केंद्रीय सत्तेचा पुरेपुर गैरवापर केला गेला. हा प्रयोग यशस्वी झाला असता तर तो लोकमताचा कौल किंवा परमेश्वराची इच्छा ठरली असती. पण महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी होताच हे घटनाबाह्य, लोकांचा पाठिंबा नसलले सरकार असल्याचे सांगितले गेले. हा दुटप्पीपणा चांगला नाही. प्रामाणिकपणाने बोलत आहात तर त्यात गल्लत का करता? असा सवालही फडणवीसांना करण्यात आला आहे.

उद्या काय होईल असे जर-तर वगैरे राजकारणात चालत नाही. पण महाराष्ट्राची एकोप्याची परंपरा कायम रहावी या फडणवीसांच्या मताशी आम्ही सहमत आहोत. नेपोलियन, सिंकदरही कायम राहिले नाहीत. राम-कृष्णही आले आणि गेले. तेथे आपण कोण?,  फडणवीस, तुमच्या मनात आलेच आहे तर कटुता संपविण्याचा विडा उचलाच! लागा कामाला!! असे शिवसेनेने म्हटले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!