‘राज्यपालांना हटवा, अन्यथा पुढच्या चार दिवसांत महाराष्ट्रद्रोह्यांविरोधात….’ आक्रमक उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा


मुंबईः महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्याचे राजकारण तापलेले असतानाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यपालांना हटवले नाही तर पक्षभेद बाजूला ठेवून आपण सर्व महाराष्ट्रप्रेमी नागरिकांनी एकत्र येऊन विरोध केला पाहिजे, असे आवाहन करतानाच पुढचे दोन-चार दिवस वाट पाहू आणि राज्यपालांना हटवले नाही तर महाराष्ट्रद्रोह्यांना एक खणखणीत इंगा दाखवलाच पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्र बंद करायचा की मोर्चा काढायचा हे आपण ठरवू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केली. आपण जर शांत बसलो तर आपल्या शूर-वीर म्हणवल्या जाणाऱ्या राज्याच्या अब्रुची लक्तरे या लोकांकडून वेशीवर टांगली जातील. त्यामुळे राज्यपालांना हटवले गेले नाही तर पक्षभेद बाजूला ठेवून आपण महाराष्ट्रप्रेमी नागरिकांनी एकत्र येऊन विरोध केला पाहिजे, असे सांगत त्यांनी राज्यातील सर्व नागरिकांना राज्यपालांच्या विरोधात उतरण्याचे आवाहन केले आहे.

ज्यांना वृद्धाश्रमातही जागा नाही, ती माणसे राज्यपालपदी: आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली आहेत. साधारणतः एक प्रघात आहे की, केंद्रात ज्यांचे सरकार असते, त्यांच्या विचारांची माणसे राज्यपाल म्हणून नेमली जातात. मात्र या माणसांची कुवत काय असते? या माणसांची पात्रता काय असते? ज्या माणसांना वृद्धाश्रमातही जागा मिळत नाही, त्यांना राज्यपाल म्हणून नेमले जाते का?  असे सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले आहेत.

या सडक्या मेंदू मागचा मेंदू कोण?: राज्यपाल जे काही बोलतात ते गांभीर्याने घेण्याची गरज आहे. कारण आपले राज्यपाल तुम्हाला माहीत आहेत. आपल्या राज्यपालांना मी राज्यपाल म्हणणेच सोडून दिले आहे. कारण राज्यपालपदाची मी नेहमी मान, बहुमान करत आलो आहे. यापुढेही करत राहीन. पण कोणी व्यक्ती केवळ राज्यपालपदाची झूल पांघरली म्हणून त्यांनी वेडेवाकडे काहीही बोलावे, हे सहन केले जाणार नाही. मी आणि महाराष्ट्रही हे मान्य करणार नाही. कोश्यारींनी या आधीही मराठी माणसांचा अपमान केल होता. या सडक्या मेंदूच्या मागील मेंदू कोण आहे, याचा शोध घेण्याची वेळ आली आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

हे कसले निःपक्ष?: राज्यपाल हे आपल्या महामहीम राष्ट्रपतींचे दूत असतात. राष्ट्रपती निःपक्ष असायला पाहिजेत. ते असतात आणि त्याच प्रमाणे राज्यपाल सुद्धा निःपक्ष असायला पाहिजे. राज्यात जर काही पेचप्रसंग उभा राहिला तर त्याची सोडवणूक राष्ट्रपती किंवा केंद्र सरकारच्या मध्यस्थीने करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असली पाहिजे, असा आपला एक समज आहे. राज्यपाल निवडीचे काही निषक असायलाच पाहिजे, असेही ठाकरे म्हणाले.

कुणीही यावे, टपली मारून जावे… जणूकाही महाराष्ट्रात माणसे राहतच नाहीत. महाराष्ट्राला स्वाभिमान, अस्मिता, हिंमत काहीच नाही. कुणीही यावे, टपली मारावे आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून गप्प बसावे, हे आता खूप झाले. महाराष्ट्र शिवाजी महाराजांना मानतोच हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यांचा अपमान झाल्यानंतर ज्यांनी महाराजांचा अपमान केला, त्यांच्याच पक्षातील नेत्यांकडून गुळगुळीत प्रतिक्रिया दिल्या जात आहेत, असेही ठाकरे म्हणाले.

 पाकव्याप्त काश्मीर जिंकल्यावर महाराष्ट्राला शंभर गावे देऊ’: सीमाप्रश्नावरही ठाकरे यांनी टिकास्त्र सोडले. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात खोके सरकार आणि मिंधे सरकार आल्यानंतर राज्याची सातत्याने अवहेलना होत आहे. आज अचानक कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात भूत संचारले आहे. महाराष्ट्रातील गावांवर कर्नाटक सरकारचे मुख्यमंत्री दावा सांगत आहेत. आज महाराष्ट्रात ईडी सरकार किंवा खोके सरकार किंवा मिंधे सरकार आहे. या सरकारला मुख्यमंत्री आहेत की नाही हेच कळत नाही. कारण मुख्यमंत्री काही बोलतच नाहीत. त्यांना काही विचारले तर ते सांगतील ‘काळजी करू नका. मी प्रधानमंत्र्यांना सांगितले आहे. ते म्हणाले की त्यांनी ४० गावे घेतली तर घेऊ द्या. आपण पाकव्याप्त काश्मीर जिंकल्यानंतर महाराष्ट्राला शंभर गावे देऊ,’ असेही ते कदाचित सांगू शकतील. त्यांच्याकडून काही अपेक्षाच नाही, अशा शब्दांत शिंदे सरकारवर ठाकरेंनी टिकास्त्र सोडले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!