मोठी बातमीः शिवसेना- वंचित बहुजन आघाडीची युती, उद्धव ठाकरे- प्रकाश आंबेडकरांची घोषणा

मुंबईः महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी मोठी बातमी आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीने युती केली आहे. या दोन नेत्यांनी आज घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.  हे दोन पक्ष आगामी सर्व निवडणुका एकत्रितच लढवणार आहेत.

आज शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीचा मुहूर्त साधून या युतीची घोषणा करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे प्रबोधनकार ठाकरे यांच्यावरील संकेतस्थळाच्या लोकार्पण कार्यक्रमात एका मंचावर आले होते. त्या कार्यक्रमात या दोन्ही नेत्यांनी एकमेकांची तोंडभर स्तुती केली होती आणि शिवसेना- वंचित बहुजन आघाडीच्या युतीचे संकेतही दिले होते. तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणात या युतीचीच चर्चा सुरू होती. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या या युतीची घोषणा आज अखेर करण्यात आली.

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची आज मुंबईतील आंबेडकर भवनात संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेतच या युतीची घोषणा करण्यात आली.  महाराष्ट्रातील जनता ज्या निर्णयाची वाट बघत होती, तो निर्णय सांगण्यासाठी आणि पुढची वाटचाल एकत्र करण्यासाठी म्हणून आम्ही या वास्तूमध्ये आलो आहोत. आंबेडकर आणि ठाकरे या नावाला इतिहास आहे. माझे आजोबा आणि प्रकाश आंबेडकरांचे आजोबा स्नेही होते. दोघांनीही समाजातील वाईट रूढी परंपरा यांच्या विरोधात आवाज उठवला. याबद्दल आम्ही दोघांनी वेगळे सांगण्याची गरज नाही. सध्या राजकारणात ज्या वाईट रूढी परंपरा सुरू आहेत, त्या मोडून टाकण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

जनतेला नको त्या वादात अडकवून भ्रमात ठेवूनच हुकुमशाही येते. त्याच वैचारिक प्रदूषणातून देशाला मोकळा श्वास घेता यावा यासाठी, देशातील लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी आणि भारतीय राज्यघटनेचे पावित्र्य जपण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत’’

-उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

 सध्याच्या राजकारणात वाईट परंपरा आणि चाली सुरू झाल्या आहेत. त्यावर आघात करन त्या मोडून-तोडून टाकण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. प्रथम देशहित महत्वाचे असते. कारण एक भ्रम पसरवला जातोय. नेहमी हुकुमशाहीकडे वाटचाल ही अशीच होते. जनतेला भ्रमात ठेवायचे, नको त्या वादात अडकवून ठेवायचे आणि आपले इप्सित साध्य करायचे  असे चालले आहे. या वैचारिक प्रदूषणातून देशाला मोकळा श्वास मिळवून देण्यासाठी आणि देशातील लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी, राज्यघटनेचे महत्व आणि पावित्र्य अबाधित राखण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

पुढे राजकीय वाटचाल कशी असेल, आणखी काय करता येईल, या सर्व गोष्टींचा त्या-त्यावेळी विचार करून आम्ही पुढे जाऊ. मात्र एक गोष्ट नक्की आहे की, महाराष्ट्रातील तळागाळातील जनतेपर्यंत देशात जे चालले आहे ते पोहचवण्याची गरज आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

“गेली अनेक वर्षे उपेक्षितांचे राजकारण सुरू होण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. ही चळवळ आम्ही चालवत होतो. तिला आमच्या मित्र पक्षाने गिळंकृत किंवा मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही न जुमानता आंदोलन करत राहिलो, लढत राहिलो. वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना एकत्र आल्याने निवडणुकीत बदलाचे राजकारण सुरू होणार आहे.”

-प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीचे नेते

निवडणुका आल्या की गरिबांचा उदोउदो करायचा, मात्र गरिबांनी मतदान केल्यावर ते रस्त्यावर आणि यांची उड्डाणे सुरू होतात. हे थांबवण्याची गरज आहे. म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

परवा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मुंबईत येऊन गेले. या सभेत कोण आले होते? कोठून आणले होते?, त्यांना काय सांगितले गेले होते?  या सर्व गोष्टी आम्ही माध्यमातून पाहिल्या आहेत, वाचल्या आहेत, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.

जिंकून येणे मतदारांच्या हातात आहे. ते राजकीय पक्षांच्या हातात नाही. परंतु उमेदवारी देणे राजकीय पक्षांच्या हातात आहे. महाराष्ट्राची सत्ता १६९ कुटुंबात होती. आता त्यात १० कुटुंबाची वाढ झाली आहे. नातेवाईकांचे राजकारण वाढल्याने गरिबांचे राजकारण बाजूला पडत गेले. त्यामुळे भांडवलशाही आणि लुटारूंची सत्ता सुरू झाली. देशात सध्या बदला घेण्याचे राजकारण सुरू आहे. एक दिवस मोदींच्या नेतृत्वाचाही अंत होईल. ईडीच्या माध्यमातून राजकीय नेतृत्व संपवण्याचे काम सुरू आहे, असे प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!