हिमायतनगर तालुक्यात ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा धोक्यात, गृह विभागाच्या आदेशाची पोलिसांकडूनच पायमल्ली!

हिमायतनगरः नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यातील पोलिसांच्या असंवेदनशीलतेमुळे ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून हिमायतनगर पोलिसांकडूनच महाराष्ट्र शासनाच्या ज्येष्ठ नागरिक धोरणाची बेमुर्वतखोरपणे पायमल्ली केली जात आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी आता सुरक्षेसाठी दाद मागायची तरी कुणाकडे? असा सवाल केला जात आहे.

भारतीय संविधानातील राज्य धोरणाच्या निर्देशक तत्वातील अनुच्छेद ३९ व ४१ मधील तरतुदींनुसार ज्येष्ठ नागरिकांना वृद्धापकाळ चांगल्या तऱ्हेने घालविता यावा, समाजामध्ये त्यांचे जीवन सुसह्य व्हावे आणि ज्येष्ठ नागरिकांचा विविध स्तरातून होणारा छळ, पिळवणूक यापासून त्यांचे संरक्षण करता यावे म्हणून महाराष्ट्र सरकारने ९ जुलै २०१८ मध्ये  राज्याचे सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर केले. परंतु या धोरणातील तरतुदी आणि त्या तरतुदीनुसार देण्यात आलेल्या जबाबदाऱ्या हिमायतनगर पोलिसांच्या गावीही नाहीत, अशीच एकंदर परिस्थिती आहे.

राज्य सरकारच्या ज्येष्ठ नागरिक धोरणाची अंमलबजावणी करण्याबाबत गृह विभागाने १० सप्टेंबर २०१८ रोजी जारी केलेल्या शासन आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत हिमायतनगर पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी असंवेदनशील असल्यामुळे तालुक्यातील विविध गावात मद्यपी गावगुंडांकडून ज्येष्ठ नागरिकांना निष्कारण मारझोड करून त्यांचा छळ करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या छळ आणि पिळवणुकीशी संबंधित प्रकरणे अत्यंत संवेदनशीलतेने आणि तातडीने हाताळावीत असे राज्य सरकारचे सक्त आदेश असतानाही हिमायतनगर पोलिसांकडून त्याकडे हेतुतः दुर्लक्ष केले जात असल्यामुळे या मद्यपी गावगुंडांची भीड चेपत चालली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचा छळ आणि पिळवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे.

हिमायतनगर तालुक्यातील सिंरजनी येथील एका ७६ वर्षीय दिव्यांग ज्येष्ठ नागरिक महिलेला ९ नोव्हेंबर रोजी एका मद्यपी गावगुंडाने लाथाबुक्क्यांनी निष्कारण मारहाण करून जखमी केले आणि जिवे मारण्याची धमकी दिली. ही दिव्यांग ज्येष्ठ नागरिक महिला पाच किलोमीटर अंतर कापत फिर्याद घेऊन हिमायतनगर पोलिस ठाण्यात गेली खरी, परंतु हिमायतनगर पोलिसांकडून तिच्या प्रकरण हाताळताना प्रचंड असंवेदनशीलता दाखवण्यात आली. आधी तर स्टाफच उपलब्ध नसल्याचे सांगत तिची फिर्याद घेण्यासही टाळाटाळ झाली नंतर काही काळ ताटकळल्यानंतर तिची फिर्याद घेण्यात आली. त्या महिलेला तिच्या फिर्यादीची पोच देण्यात आली नाही आणि केलेल्या कारवाईचे दस्तावेजही उपलब्ध करून देण्यात आले नाहीत.

 विशेष म्हणजे महिला असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या बीटमध्ये ही घटना घडूनही त्या बीट जमादार महिला पोलिस कर्मचाऱ्यांने या ज्येष्ठ नागरिक दिव्यांग महिलेच्या प्रकरणात संवेदनशीलता दाखवली नाही. एनसी दाखल केल्यानंतर फिर्याद दिल्याच्या दुसऱ्या दिवशी संबंधित गावगुंडाला तासभर पोलिस ठाण्यात बसवून नंतर सन्मानाने सोडून देण्यात आले. त्यामुळे हा मद्यपी गावगुंड उजळमाथ्याने गावात फिरत आहे. या मद्यपी गावगुंडाने यापूर्वी गावातील अन्य ज्येष्ठ नागरिक महिला- पुरूषांचीही पिळवणूक आणि छळ केला आहे. तरीही पोलिसांनी या प्रकरणात ना संवेदनशीलता दाखवली ना स्थळ पंचनामा केला. हिमायतनगर पोलिसांना ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा आणि जिवीताच्या रक्षणापेक्षाही मद्यपी गावगुंडांची भलामण करण्यात धन्यता वाटत असल्याचे एकंदर चित्र आहे.

काय सांगतो गृह विभागाने जारी केलेला शासन आदेश?:  महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राज्यातील पोलिसांसाठी १० सप्टेंबर २०१८ रोजी शासन आदेश जारी करून (परिपत्रक क्रमांकः व्हीआयपी-०८१८/प्र.क्र.४६४/पोल-१३) ज्येष्ठ नागरिक धोरणाची अंमलबजावणी करण्याबाबत आदेशित केले आहे. या शासन आदेशातील निर्देश असेः

१.ज्येष्ठ नागरिकांचा विविध स्तरातून होणारा छळ, पिळवणूक यापासून त्यांचे संरक्षण करण्यात यावे.

२. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच पोलीस आयुक्तालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्पलाइन सुरू करण्यात यावी. याव्दारे आणीबाणीच्या वेळी ज्येष्ठ नागरिकांना तत्काळ आरोग्य सेवा आवश्यक सूचना तथा सुरक्षा विषयक मदत उपलब्ध करण्याबाबत उचित कार्यवाही करावी.

३. पोलिसांनी ज्येष्ठांची सुरक्षितता व अन्य प्रश्न यामध्ये जाणीवपूर्वक प्रयत्नशील राहण्यासाठी जागरूकता दाखवावी. ज्येष्ठ नागरिकांना होणारे विविध सतावणुकीसंबंधी तक्रारी प्राधान्याने व खास लक्ष देऊन कायद्याच्या चौकटीत सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे.

४.आईवडिल व ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणासाठी नियम २०१० च्या प्रकरण ६ मधील नियम २० मध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या जिवितांचे मालमत्तेचे संरक्षण करण्याबाबत कृती आराखडा विनिर्दिष्ठ केला आहे. त्याच प्रमाणे पोलीस ठाण्यात त्यांच्या हद्दीत राहणाऱ्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचे विशेषतः एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची अद्ययावत यादी ठेवण्यात यावी.

५. पोलीस ज्येष्ठ नागरिकांवर मैत्रीपूर्ण लक्ष ठेवतील. पोलीस ठाण्याच्या प्रतिनिधीने सामाजिक कार्यकर्ता अथवा स्वयंसेवक यांच्यासह नियमितपणे एकाकी व अशक्त ज्येष्ठ नागरिकांना सदिच्छा भेट द्यावी. यासाठी पोलिसांनी सामाजिक संस्थांची मदत घ्यावी.

६. पोलीस घटक प्रमुख यांनी वरील सूचना सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांच्या निदर्शनास आणाव्यात व त्या सूचनांचे तंतोतंत पालन होईल यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी.

हिमायतनगर पोलिस ठाण्याचे प्रमुख भुसनूर आणि या पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पुरूष/महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी गृह विभागाचा हा आदेश वाचलेलाच दिसत नाही किंवा त्याकडे ते हेतुतः दुर्लक्ष तरी करत आहेत.

गृह विभागाने हा शासन आदेश जारी केला खरा परंतु हिमायतनगर पोलिसांकडून या आदेशातील एकाही निर्देशाचे पालनच केले जात नसल्याचे चित्र असल्यामुळे तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांचा छळ, पिळवणूक व सतावणुकीचे प्रकार वाढीस लागले आहेत. आता जिल्हा पोलीस अधीक्षक यावर काय कारवाई करतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!