सत्यजित तांबे काँग्रेसमधून निलंबित, बंडखोरीमुळे प्रदेश काँग्रेसची कारवाई

मुंबईः  काँग्रेसमध्ये बंडखोरी करून विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले सत्यजित तांबे यांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले आहे. पक्षाचा आदेश झुगारून नाशिकमधून अपक्ष उमेदवारी दाखल केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

सत्यजित तांबे यांना निलंबित करण्यात आलेले आहे. ही कारवाई आजच करण्यात आली आहे. तांबे परिवाराचे काय झाले? याबाबतचे प्रश्न आता आम्हाला विचारू नये. कारण त्यांना आम्ही पक्षातून निलंबित केले आहे. राहिला प्रश्न बाळासाहेब थोरातांचा तर ते आमचे नेते आहेत. सध्या ते रूग्णालयात आहेत. आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत, असे नाना पटोले म्हणाले.

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर अशा पाच मतदारसंघात सध्या निवडणूक होत आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे यांनी पक्षाचा आदेश झुगारून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे नाशिकची निवडणूक चर्चेचा विषय ठरली आहे.

नाशिकची जागा महाविकास आघाडीत काँग्रेसकडे आली आहे. या मतदारसंघात विद्यामान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यासाठी काँग्रेसने एबी फॉर्मही दिला होता. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपेपर्यंत डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाच नाही.  त्याऐवजी त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर महाराष्ट्रात नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत.  महाविकास आघाडीने नाशिकमधून आता शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!