मुंबईः भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी मोठा निर्णय घेत दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर काढल्या आहेत. ज्यांच्याकडे दोन हजार रुपयांच्या जुन्या नोटा असतील, त्यांना २३ मे ते ३० सप्टेंबर या कालावधीत आपल्याकडच्या नोटा बँकेत जमा करता येतील. मात्र एका वेळी दोन हजार रुपयांच्या केवळ १० नोटाच, म्हणजे २० हजार रुपयेच बँकेत जमा करता येतील.
इतर मूल्यांच्या नोटा बाजारात पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत, असे कारण देत रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय आज शुक्रवारी जाहीर केला आहे. असे असले तरी दोन हजार रुपयांच्या बँक नोटा कायदेशीर निविदा (legal tender) म्हणून सुरू राहणार आहेत. म्हणजेच या नोटा सध्या तरी अवैध ठरणार नाहीत.
दोन हजार रुपयांची नोट चलनातून बाद करतानाच रिझर्व्ह बँकेने इतर बँकांना दोन हजार रुपयांच्या नोटा जारी करणे थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. इथून पुढे दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद होणार आहे.
क्लिन नोट पॉलिसी अंतर्गत हा निर्णय घेतल्याचे रिझर्व्ह बँकेचे म्हणणे आहे. दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद होणार असली तरी या नोटा लगेचच बंद होणार नाहीत. मात्र या नोटा ग्राहकांना देण्यात येऊ नयेत, असे निर्देश रिझर्व्ह बँकेने देशभरातील बँकांना दिले आहेत. २३ मे ते ३० सप्टेंबर या काळात नागरिकांना बँकेतून नोटा बदलून घेता येतील.
९ सप्टेंबर २०१६ रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अचानक नोटाबंदीची घोषणा करत ५०० रुपये आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. त्यानंतर बाजारात ५०० रुपयांची नवीन नोट आली. मात्र १००० रुपयांच्या नोटेच्या जागी २००० रुपयांची नवीन नोट चलनात आणण्यात आली होती. मात्र रिझर्व्ह बँकेने २०१९ पासून दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद केली होती.
१ हजार रुपयांची नोट बाद करून त्या जागी दोन हजार रुपयांची नोट चलनात आणण्याच्या निर्णयावर तेव्हाच जोरदार टिका झाली होती. दोन हजार रुपयांची नोट चलनात आणल्यामुळे नोटाबंदीचा नेमका उद्देश तरी काय होता? असा सवाल तेव्हा करण्यात आला होता.