RBI Policy: रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वाढवला, वाढत्या महागाईत सर्वसामान्य कर्जदारांना व्याजदरवाढीचा धक्का!


मुंबईः भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) नव्या वर्षातील पहिले पतधोरण आज जाहीर केले असून रेपो रेटमध्ये ०.२५ बेस पॉइंटने वाढ केली आहे. त्यामुळे आरबीआयचा व्याजदर ६.५ टक्क्यांवर पोहोचला आहे. रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आल्यामुळे सर्वसामान्यांसाठी कर्ज आणि ईएमआय महाग झाले आहेत. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य कर्जदारांना हा एक धक्काच आहे.

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक ६ फेब्रुवारीपासून सुरू झाली होती. समितीच्या सहा सदस्यांपैकी चार सदस्यांच्या बहुमताने या तिमाहीतील पहिले पतधोरण मंजूर करण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज या पतधोरणाची घोषणा केली.

भारतीय अर्थव्यवस्था लवचिक बनलेली आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी वास्तविक जीडीपीचा वृद्धीदर ६.४ टक्के राहील. पहिल्या तिमाहीत तो ७.८ टक्के, दुसऱ्या तिमाहीत ६.२ टक्के, तिसऱ्या तिमाहीत ६ टक्के आणि चौथ्या तिमाहीत ५.८ टक्के राहण्याचा अंदाज आहे, असे शक्तिकांत दास म्हणाले.

मागील वर्षी विक्रमी महागाईच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने रेपो दरात सलग पाचवेळा वाढ केली होती. यापूर्वीच्या पतधोरणात डिसेंबर २०२२ मध्ये रेपो दरात ०.३ टक्के वाढ करण्यात आली होती. त्यामुळे रेपो रेट ६.२५ टक्क्यांवर पोहोचला होता. रिझर्व्ह बँकेने ही दरवाढ कायम ठेवली असून आताच्या दरवाढीमुळे रेपो रेट आता ६.५ टक्क्यांवर पोहोचला आहे.

 जागतिक अर्थव्यवस्थेतील चढउतार आणि उतार महागाईच्या आकडेवारीचा भारतीय अर्थव्यवस्थेवरही परिणाम होत आहे. भारतीय अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत आहे. परंतु जागतिक आव्हानानुसार निर्णय घ्यावे लागतील, असे शक्तिकांत दास म्हणाले.

ईएमआय वाढणारः रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये वाढ केल्यामुळे येत्या काही दिवसांत सर्व सरकारी आणि खासगी बँकांबरोबरच वित्तीय संस्थांच्या गृहकर्जाचे व्याजदरही वाढणार आहेत. त्यामुळे गृहकर्जदाराचा ईएमआयही महाग होईल. उदाहरणार्थः समजा तुम्ही २० वर्षे कालावधीसाठी २५ लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले असेल तर आधी ८.६० टक्के व्याजदराने २१ हजार ८५४ रुपयांचा ईएमआय भरावा लागत होता. आता रेपो रेटच्या बेस पॉइंटमध्ये ०.२५ टक्के वाढ केल्यामुळे बँकेचा व्याजदर ८.८५ टक्क्यांपर्यंत वाढेल. परिणामी ईएमआय २२ हजार २५३ रुपये भरावा लागेल. म्हणजेच ईएमआयमध्ये ४० रुपयांची वाढ होईल.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!