अर्थव्यवस्था सुस्तावली: आरबीआयने वाढवला रेपो रेट; गृह कर्जासह सर्व कर्जे महागणार!


मुंबईः भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो रेटमध्ये ३५ आधार अंकाच्या वाढीची घोषणा केली आहे. गेल्या आठ महिन्यात रेपो रेटमध्ये आरबीआयने केलेली ही पाचवी वाढ आहे. या वाढीमुळे रेपो रेट आता ५.९ टक्क्यांवरून ६.२५ टक्क्यांवर गेला आहे. या रेपो रेट वाढीचा परिणाम गृह कर्जे आणि बँकांकडून इतर बाबींसाठी दिल्या जाणाऱ्या कर्जांच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. २०२३ मध्ये आर्थिक विकास दराचा अंदाज ७ टक्क्यांवरून ६.८ टक्क्यांवर आला आहे. याचाच अर्थव्यवस्था वाढीचा वेग सुस्तावला आहे.

आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीतील निर्णय शक्तिकांत दास यांनी जाहीर केले. वाढती महागाई हा आरबीआयच्या चिंतेचा मुख्य विषय आहे, मात्र सरकारला वाढत्या महागाईवर नियंत्रण आणताना दिसून येत नाही. त्याचा परिणाम आरबीआयच्या चलन धोरणावर स्पष्ट दिसू लागला आहे.

ऑक्टोबरमध्ये किरकोळ महागाईचा दर ६.७७ टक्के होता, तो आरबीआयच्या सहनशीलता स्तर म्हणजेच टॉलरन्स लेवलपेक्षा ६ टक्के जास्त आहे. आतापर्यंत महागाई नियंत्रणात आणता येऊ शकली नाही. महागाईला लक्ष्यित स्तरावर परत आणण्यासाठी आरबीआयवर प्रचंड दबाव आहे. त्यासाठी आरबीआयला कठोर पावले उचलणे आवश्यक होते, म्हणून रेपो रेटमध्ये ही वाढ करण्यात आली आहे.

एवढे सगळे असूनही भारत अजूनही वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे आणि त्यात सातत्याने सुधारणा होत आहे, असे शक्तिकांत दास म्हणाले. २०२३ मधील आर्थिक विकास वाढीचा दर ७ टक्क्यांवरून ६.८ टक्क्यांवर आणण्यात आला असला तरी आरबीआय गव्हर्नरच्या आशा मात्र कायम आहेत.

चलनविषयक धोरण समितीच्या निर्णयाची माहिती देताना शक्तिकांत दास यांनी महागाईविरुद्धच्या लढाईवर आरबीआयचे लक्ष्य आणि त्याची आवश्यकतेचा पुनरूच्चार केला. आम्ही महागाईवर अर्जुनासारखी नजर ठेवू, असे ते म्हणाले. याचाच अर्थ फेब्रुवारी २०२३ मध्ये रेपो रेटमध्ये कमीत कमी २३ ते २५ बेसिक पॉइंटची वाढ केली जाण्याची शक्यता आहे.

यापूर्वी आरबीआयने रेपो रेटमध्ये चार वेळा वाढ केली आहे. या रेपो रेट वाढीचा परिणाम गृह कर्जांसह सर्व प्रकारची कर्जे महागण्यात होणार आहे. आरबीआयकडून बँकांना रेपो दरानुसार अल्पकालीन कर्जे दिली जातात. त्यामुळे रेपो रेट वाढला की कर्जाचा व्याजदरही वाढत असतो. आजच्या रेपो दरवाढीचा परिणाम आता थेट तुमच्या खिशावरही होणार आहे. आरबीआयने आज केलेल्या रेपो रेट वाढीमळे कर्जाचे ईएमआय वाढतील आणि घर किंवा कार घेणेही महाग होईल. याशिवाय वाहन किंवा इतर कर्जेही महाग होणार आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!