वेतन पडताळणी पथक २२ नोव्हेंबरपासून मराठवाडा दौऱ्यावर


औरंगाबाद: सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पडताळणी करण्यासाठी वेतन पडताळणी पथक मराठवाड्यात येत असून औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यातील व तालुका स्तरीय सर्व कार्यालयांसाठी २२ ते २५ नोव्हेंबर  तर लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व कार्यालयांसाठी २६ ते ३० नोव्हेंबर असा कालावधी राहणार आहे. दौऱ्याचे ठिकाण वेतन पडताळणी कार्यालय, औरंगाबाद असणार आहे.

औरंगाबाद मुख्यालयी दौऱ्याच्या ठिकाणी ३१ मार्च २०२३ पर्यंत सेवानिवृत्त होणारे व झालेले अधिकारी तसेच कर्मचारी तसेच न्यायालयीन, लोकायुक्त प्रकरणे यांचे मूळ सेवापुस्तके प्राधान्याने निकाली काढण्याच्या दृष्टीने दौरा कार्यक्रम आयोजित केला आहे. मराठवाडा विभागातील सर्व कार्यालय प्रमुख यांनी त्यांच्या कार्यालयातील ३१ मार्च २०२३ पर्यंत सेवानिवृत्त होणार व झालेले अधिकारी व कर्मचारी यांची मूळ सेवापुस्तके पडताळणीसाठी प्राधान्याने दाखल करावी,असे आवाहन करण्यात आले आहे.

सेवापुस्तकात २० जानेवारी २००१ च्या वित्त विभागाच्या शासन परिपत्रकानुसार सोबतच्या जोडपत्राप्रमाणे परिपूर्ण पूर्तता करुन जोडपत्र सेवापुस्तकात जोडणे आवश्यक आहे. सेवापुस्तके पडताळणीसाठी दाखल करताना शासन निर्णय वित्त विभाग १४ मे २०१९ नुसार वेतनिका प्रणालीमार्फत वेतन पडताळणी पथकाकडे तपासणीसाठी सादर करावयाचे आहे. त्याशिवाय मुळ सेवापुस्तके स्वीकारली जाणार नाहीत.

अधिकारी आणि कर्मचारी यांनी सेवाज्येष्ठतेनुसार मिळालेली प्रत्यक्ष पदोन्नती नाकरलेली असल्यास तसेच कालबद्ध आश्वासीत प्रगती योजनेचा लाभ दिलेल्या अधिकारी तसेच कर्मचारी यांनी त्यानंतर प्रत्यक्ष दिलेली पदोन्नती नाकारली असल्यास त्याबाबतची नोंद त्यांच्या मुळ सेवापुस्तकात घेणे आवश्यक असल्याचे लेखा व कोषागरे औरंगाबाद विभागाचे सहसंचालक उत्तम सोनकांबळे यांनी कळवले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!