हेडफोन न लावता मोबाईलवर व्हिडीओ पाहिल्यास ५ हजार रुपये दंड, ३ महिने तुरूंगाची हवा!

मुंबईः  मोबाईल हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. परंतु काही जणांना मोबाईल कुठे आणि कसा वापरावा याचेही भान राहात नाही. काही जण तर रेल्वे, बस, मेट्रो किंवा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाज मोबाईलवर व्हिडीओ पाहताना आढळून येतात. आपल्यामुळे इतर लोकांना त्रास होतोय, याचेही भान न ठेवणाऱ्या मोबाईल वापरकर्त्यांना चाप लावण्यासाठी एक नवीन नियम आणण्यात आला आहे. या नियमानुसार तुम्ही जर हेडफोन न लावता मोबाईलवर व्हिडीओ पहात असाल तर तुम्हाला ५ हजार रुपये दंड आणि ३ महिने तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

सार्वजनिक ठिकाणी होणारा गोंगाट हे हा नवीन नियम लागू करण्यामागचे कारण आहे. सहप्रवाश्याला त्रास किंवा असुविधा होऊ नये आणि गोंगाट थांबावा, हा या नियमामागचा हेतू आहे.

रेल्वे, बस किंवा मेट्रोमधून प्रवास करताना अनेक जण मोठ्या आवाजात मोबाईलवर व्हिडीओ पहात असतात. त्याचा इतर प्रवाशांना नाहक त्रास होतो. काही बोलायला गेले तर भांडण होण्याचीच जास्त शक्यता असते. म्हणून सहप्रवाशी हा त्रास निमूटपणे सहन करतात. हा त्रास होऊ नये आणि ध्वनी प्रदूषणाला आळा बसावा म्हणूनच हा नवीन नियम आणण्यात आला आहे.

या नियमाची अंमलबजावणी मुंबईत सुरूही झाली आहे. बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाई ऍण्ड ट्रान्सपोर्ट म्हणजेच बेस्टने याबाबतची एक अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार आता बेस्टच्या बसमधून प्रवास करताना मोबाईल फोनच्या स्पीकरवर तुम्ही व्हिडीओ पाहिल्यास किंवा गाणे वाजवल्यास  किंवा मोबाईल फोनवर मोठ्या आवाजात बोलल्यास तुम्हाला ५ हजार रुपये दंड आणि ३ महिने तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

बेस्टच्या बसमध्ये या आठवड्यापासून हा नवीन नियम लागू करण्यात आला आहे. या नवीन नियमाबाबत जनजागृती केली जात आहे.

बेस्टनंतर आता हळूहळू सार्वजनिक वाहतुकीच्या सर्वच ठिकाणी या नवीन नियमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही प्रवासाला जात असाल आणि प्रवासात विरंगुळा म्हणून मोबाईल फोनवर तुम्हाला व्हिडीओ पहायचे असतील किंवा गाणे ऐकायचे असतील तर सोबत हेडफोन जरूर घेऊन जा अन्यथा ५ हजार रुपये दंड भरण्याची आणि ३ महिने जेलची हवा खाण्याची तयारी ठेवा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!