राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत उद्धव ठाकरे, शरद पवार हे महाराष्ट्राचे राजकारण कूस बदलण्याचे संकेत; भाजप अस्वस्थ!

मुंबईः राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेही सहभागी होणार आहेत. या घडामोडीचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. सुमारे तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील सत्तेची समीकरणे बदलण्यासाठी हे तिन्ही पक्ष एकत्र आले होते आणि अडीच वर्षांपर्यंत सत्तेतही राहिले. महाराष्ट्राच्या राजकारणात हा नवीन प्रयोग झाला तेव्हा बहुतांश राजकीय विश्लेषकांनी सत्ता हेच महाविकास आघाडीचे एकमेव उद्दिष्ट असल्याचे सांगत या नवीन प्रयोगाची संभावना केली होती. परंतु आता सत्ता जाऊनही काँग्रेसच्या नेतृत्त्वातील भारत जोडो यात्रेत शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षाचे नेते सहभागी होत असल्याने त्याचे राजकीय अन्वयार्थ लावले जाऊ लागले आहेत.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्र आल्यानंतर काही काळानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार फोडून भाजप पुन्हा सत्तेत येईल, असेही अंदाज त्यावेळी बांधण्यात आले होते. परंतु भाजपने शिवसेनेतच फूट पाडली आणि राज्याची सत्ता हस्तगत केली. आता महाविकास आघाडी सत्तेत राहिलेली नाही, तरीही तिन्ही पक्षांच्या एकत्र येण्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

भारत जोडो यात्रेचा कोणताही निवडणूक अजेंडा नाही, असे काँग्रेसकडून वारंवार सांगितले जात आहे, परंतु काँग्रेसचा थकून झोपी गेलेला ‘ग्रास रूट’चा कार्यकर्ता आता जागे होऊन उत्साहाने सक्रीय होऊ लागला आहे, हे भारत जोडो यात्रेदरम्यानच स्पष्ट झाले आहे.

ज्या कार्यकर्त्याला आपल्या राज्यस्तरीय नेत्यांची भेट घेण्यासाठी प्रचंड खस्ता खाव्या लागत होत्या, आज ते आपल्या सर्वोच्च नेत्याच्या पावलासोबत पाऊल टाकत चालू लागले आहेत. म्हणजेच काँग्रेसची भारत जोडो यात्रा संघटना आणि पक्षाला भक्कम करण्याचा भगीरथ प्रयत्न आहे. काँग्रेसच्या या भारत जोडो यात्रेला कुठे, किती आणि कसे यश मिळेल, याचे उत्तर नजीकच्या काळात मिळेलच. या भारत जोडो यात्रेमुळे देशभरातील वातावरण ढवळून निघाले आहे, तरीही मुख्य प्रवाहातील मीडियाकडून या यात्रेची म्हणावी तशी दखल घेतली जात नाही, हे स्पष्ट असले तरी राजकीयदृष्ट्या जागरूक नागरिकांत काँग्रेसची ही भारत जोडो यात्रा मुख्य चर्चेचा मुद्दा बनली आहे.

संग्रहित छायाचित्र.

…अशात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वातील काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत पावलाला पाऊल मिळवून चालत असतील तर महाविकास आघाडीचा हेतू केवळ सत्ता नव्हे तर एका विचारधारेच्या विरोधातील लढाई आहे, असा संदेश या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांतच नव्हे तर सर्वसामान्य जनतेतही जाईल, त्यामुळेच या दोन नेत्यांचे भारत जोडो यात्रेत सहभागी होणे महत्वाचे मानले जात आहे.

काँग्रेसचा हा प्रयत्न यशस्वी करण्यासाठी त्याचे मित्र पक्ष का सहकार्य करत आहेत? काँग्रेसचीच पाळेमुळे खिळखिळी करून आपली ताकद वाढवण्याचा अथक प्रयत्न करत असलेला राष्ट्रवादी काँग्रेससारखा पक्षही काँग्रेसच्या या प्रयत्नात का सहभागी होत आहे? असे मुख्य प्रश्न उपस्थित होतात. विद्यमान राजकीय वातावरणात काँग्रेसची ढालच आपले रक्षण करू शकते, याची खात्री तर काँग्रेसच्या मित्र पक्षांना पटली नसेल ना?, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. केंद्रात सत्तारूढ असलेला भारतीय जनता पक्ष आणि त्याच्याकडून सरकारी यंत्रणेच्या दुरूपयोगाचा वापरण्यात येऊ लागलेला फॉर्म्युला पाहता देशातील सर्वच छोट्या मोठ्या प्रादेशिक पक्षाचे जे स्वतंत्र अस्तित्व होते, तेच धोक्यात आले आहे. त्यामुळे कदाचित त्यांना काँग्रेसची ढाल हेच आता एकमेव सुरक्षा कवच वाटू लागले असण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेसाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह अनेक काँग्रेस नेते मैदानात उतरले आहेत आणि भाजपकडून या भारत जोडो यात्रेच्या विरोधात वातावरण पेटवण्याचे शक्य ते सर्व प्रयत्न केले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर तीन-चार आठवड्यांपूर्वी अशोक चव्हाण हे काही आमदारांना सोबत घेऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या मीडियात चालवण्यात आल्या होत्या, यावरूनच काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेमुळे भाजपमध्ये किती अस्वस्थता पसरली आहे, याचा अंदाज येतो.

काँग्रेस कमकुवत होणे हे विरोधी पक्षांसाठी चांगले संकेत नाहीत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वारंवार सांगितले आहे. विरोधी पक्षाचे अस्तित्वच धोक्यात आल्याचे संकेत नजीकच्या काळात मिळू लागल्यामुळे देशातील सर्वच छोटे मोठे राजकीय पक्ष कमालीचे अस्वस्थ होते. त्यामुळे आता भारत जोडो यात्रेच्या रुपाने काँग्रेसने  सुरू केलेल्या एका प्रामाणिक आणि सकारात्मक पुढाकारात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी सहभागी होणे हे चांगले संकेत मानले जाऊ लागले आहेत.

महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष भलेही असेल परंतु जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत निवडणुकात महाराष्ट्रभरात भाजपनंतर काँग्रेसच दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. जिल्हा परिषद निवडणुकात काँग्रेस नंबर एकचा पक्ष ठरला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेसचा जनाधारही आहे. विदर्भात तर भाजपपुढे खरे आव्हान काँग्रेसचेच आहे.

 या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीचे एकसंघ राहणे भाजपची डोकेदुखी वाढवणारे ठरू पहात आहे. महाविकास आघाडीचे एकसंघ राहणे शहरी भागात भाजपची आणखीच डोकेदुखी वाढवणारे ठरणार आहे.

शहरी भागात भाजपला महाविकास आघाडीचा भक्कमपणे मुकाबला करता आला नाही तर भविष्यात होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपचे गणितही बिघडू शकते. महाविकास आघाडीने एकसंघपणे या निवडणुका लढल्या तर विजय त्यांचाच होईल, अशी एकंदर परिस्थिती दिसू लागल्यामुळेही महाविकास आघाडीच्या या ‘कदम कदम मिलाए जा…’ला महत्व प्राप्त झाले आहे.

…अशात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वातील काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत पावलाला पाऊल मिळवून चालत असतील तर महाविकास आघाडीचा हेतू केवळ सत्ता नव्हे तर एका विचारधारेच्या विरोधातील लढाई आहे, असा संदेश या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांतच नव्हे तर सर्वसामान्य जनतेतही जाईल, त्यामुळेच या दोन नेत्यांचे भारत जोडो यात्रेत सहभागी होणे महत्वाचे मानले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!