ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ. आनंद तेलतुंबडे यांना जामीन, अर्बन नक्षलवाद प्रकरणात उच्च न्यायालयाचा दिलासा


मुंबईः  अर्बन नक्षलवादाच्या आरोपाखाली दोन वर्षांपूर्वी अटक करण्यात आलेले ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत, लेखक प्रा. अनिल तेलतुंबडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला आहे. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर प्रा. तेलतुंबडे यांना जामीन मंजूर करण्यात आला असून त्यांना एनआयए म्हणजेच राष्ट्रीय तपास यंत्रणेने १४ एप्रिल २०२० रोजी अटक केली होती.

 अर्बन नक्षलवाद प्रकरणी एप्रिल २०२० मध्ये अटक केल्यापासन प्रा. आनंद तेलतुंबडे हे तळोजा तुरूंगात बंदिस्त आहेत. प्रा. तेलतुंबडे यांनी नियमित जामिनासाठी केलेली याचिका न्या. अजय गडकरी आणि न्या. मिलिंद जाधव यांनी योग्य ठरवली. रोख रक्कम सादर करून जामिनावर सुटका करण्याची तेलतुंबडे यांचे वकील मिहीर देसाई यांनी केलेली मागणीही न्यायालयाने मान्य केली.

विशेष न्यायालयाने प्रा. तेलतुंबडे यांनी जामिनासाठी केलेला अर्ज फेटाळून लावल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. २१ डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या एल्गार परिषदेला आपण अनुपस्थित होतो. त्यामुळे चिथावणीखोर भाषण देण्याचा आणि या प्रकरणाचा आपल्याशी काहीही संबंध नाही, असा दावा तेलतुंबडे यांच्या वकिलांनी जामिनाची मागणी करताना केला. त्यावर तेलतुंबडे हे एल्गार परिषद आयोजित करणाऱ्यांपैकी एक होते. शिवाय ते सीपीआय (माओवादी) या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेचे सक्रीय सदस्य आहेत, असा युक्तिवाद एनआयएचे वकील संदेश पाटील यांनी तेलतुंबडे यांच्या जामिनाला विरोध करताना केला.

 तेलतुंबडे यांच्याविरुद्ध कलम ३८ आणि ३९ नुसार दहशतवादी संघटनेतील सदस्यांशी संबंध असल्याबाबत फक्त गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यामध्ये कमाल शिक्षा १० वर्षे तुरूंगवासाची आहे. तेलतुंबडे यांनी दोन वर्षांहून अधिक काळ तुरूंगवास भोगला आहे. त्यामुळे न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली.

 पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेनंतर भीमा कोरेगाव येथे ३१ डिसेंबर २०१७ आणि १ जानेवारी २०१८ रोजी हिंसाचार झाला होता. या प्रकरणी तेलतुंबडे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. एल्गार परिषदप्रकरणी एनआयएने गौतम नवलखा, आनंद तेलतुंबडे, ज्योती जगताप, स्टॅन स्वामी, मिलिंद तेलतुंबडे, सुधा भारद्वाज, वरवरा राव यांच्यासह आठजणांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!