आपली दिवाळी तुळशीच्या लग्नापर्यंत: शिक्षणमंत्री दीपक केसरकरांकडून ऐनदिवाळीत राज्यातील जनतेला अजब ‘शिक्षण’!

मुंबईः एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने दिवाळीच्या तोंडावर मोठा गाजावाजा करून शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ देऊन दिवाळी गोड करण्याची घोषणा केली खरी, परंतु दिवाळीचे दोन दिवस उलटून गेले तरी गोरगरिबांना दिवाळी फराळासाठी आवश्यक असलेला आनंदाचा शिधा अनेक रेशन दुकानांत पोहोचलाच नाही. त्यामुळे नाराजी व्यक्ती केली जात असतानाच राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ‘मराठी लोकांची दिवाळी तुळशीच्या लग्नापर्यंत असते, त्यामुळे उशिरा का होईना पण घरोघरी आनंदाचा शिधा नक्की पोहोचेल’ असे सांगत महाराष्ट्रातील जनतेला ऐनदिवाळीत अजबच ‘शिक्षण’ दिले आहे.

दीपक केसरकर यांच्या वक्तव्यानंतर आनंदाचा शिधा तुळशीच्या लग्नापर्यंत मिळणार असेल तर महाराष्ट्रातील नागरिकांनी दिवाळीचा फराळ त्यानंतर करायचा का? असा सवाल अनेकांकडून विचारला जात आहे.

ऐन दिवाळीच्या तोंडावर शिंदे- फडणवीस सरकारने शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयांत आनंदाचा शिधा देऊन दिवाळी गोड करण्याची घोषणा केली होती. या आनंदाच्या शिधामध्ये रवा, साखर, गोडेतेल, चणाडाळ या वस्तू देण्यात येणार होत्या. शिंदे- फडणवीसांची ही घोषणा प्रचंड लोकप्रिय ठरली होती. शंभर रुपयांत आनंदाचा शिधा मिळणार म्हणून गोरगरिबांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.

रेशन दुकानांतून मिळणाऱ्या साहित्यावर अवलंबून असणारी राज्यातील लाखो कुटुंबे  हा ‘आनंदाचा शिधा’ घेऊन दिवाळी गोड करण्याची स्वप्ने पहात होती. परंतु दिवाळी सुरू होऊन दोन दिवस उलटून गेले तरी अनेक रेशन दुकानांत हा आनंदाचा शिधा पोहोचलाच नाही. परिणामी या ‘आनंदाचा शिधा’ मिळणार म्हणून वाट बघत बसलेल्या अनेक कुटुंबाचा चांगलाच हिरमोड झाला. त्यामुळे त्यांना खुल्या बाजारातून चढ्या भावाने फराळाचे साहित्या विकत घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांतून शिंदे- फडणवीस सरकारबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

 घोषणा करूनही आनंदाचा शिधा शिधापत्रिकाधारकांपर्यंत का पोहोचला नाही? अशी विचारणा शिंदे-फडणवीस सरकारमधील शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली असता झालेली चूक कबुल करण्याऐवजी त्यांनी ऐनदिवाळीत राज्यातील जनतेला अजबच ‘शिक्षण’ दिले आहे.

 मराठी लोकांची दिवाळी तुळशीच्या लग्नापर्यंत असते. त्यामुळे उशिरा का होईना पण आनंदाचा शिधा घरोघरी नक्की पोहोचेल, असे केसरकर म्हणाले. केसरकर यांच्या वक्तव्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आनंदाचा शिधा तुळशीच्या लग्नापर्यंत मिळाला तर राज्यातील नागरिकांनी दिवाळीचा फराळ त्यानंतर करायचा का? असा सवाल अनेकांकडून विचारला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!