‘मे महिन्यात राज्यात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका, तयारीला लागा!’


पुणेः उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार पाडून राज्यात एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार अस्तित्वात आल्यानंतर या सरकारला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. तेव्हापासूनच हे सरकार कधीही पडू शकते, असे अंदाज बांधले जात असतानाच आज महाराष्ट्राच्या राजकारणातील जाणते नेतृत्व आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी राज्यात येत्या मे महिन्यात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका होतील, असे सांगत कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचा आदेश दिला आहे.

शरद पवार यांनी आज पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आणि ग्रामीण भागातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधताना शरद पवार यांनी येत्या मे महिन्यात राज्यात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका लागतील. त्यामुळे निवडणुकीच्या कामाला लागा, असे थेटच सांगून टाकले आहे, अशी माहिती बैठकीला उपस्थित असलेल्या एका पदाधिकाऱ्याने दिली.

आगामी महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसायला सुरूवात केली आहे. भाजप, शिवसेना (दोन्ही गट), काँग्रेस अशा सर्वच पक्षांनी आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखायला सुरूवात केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे नुकतेच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येऊन गेले आहेत. त्यांनीही कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीसाठी उत्साह भरण्याचा प्रयत्न केला आहे.

आता राजकारणातील तेल लावलेला पैलवान अशी ओळख असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही या निवडणुकासांठी रणनीती आखायला सुरूवात केली आहे. आज त्यांनी जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला. या दरम्यान शरद पवारांनी कार्यकर्त्यांना त्यांच्या अडचणीही विचारल्या. तेव्हा कार्यकर्त्यांनी त्यांच्या समोरच गटबाजीचा पाढा वाचला.

 राज्यात बहुतांश महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका न झाल्यामुळे या स्थानिक स्वराज संस्थांचा कारभार सध्या प्रशासकांच्याच हाती आहे. या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांबरोबरच न्यायालयीन कचाट्यात अडकलेले शिंदे- फडणवीस सरकार कधीही कोसळू शकते, अशी शक्यता गृहित धरून जवळपास सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. या तयारीचा भाग म्हणून शरद पवार यांनी थेट जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यास सुरूवात केली आहे.

राज्यात येत्या मे महिन्यात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका लागतील, असा थेट संदेशच शरद पवार यांनी आज पुण्यातील तालुकाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला आहे. शरद पवार हे राजकीय अंदाज बांधण्यात निष्णात समजले जातात. निवडणुकीचे भाकीत वर्तवण्यात तर त्यांचा हातखंडा मानला जातो. आता त्यांनीच राज्यात मे महिन्यात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका लागतील, असे भाकीत केल्यामुळे राज्यात लवकरच निवडणुकांची रणधुमाळी सुरू होईल, असे मानले जाऊ लागले आहे.

 राष्ट्रवादीची लवकरच राज्यभर शिबिरेः या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह फुंकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस लवकरच राज्यभर कार्यकर्त्यांची शिबिरे घेणार आहे. कार्यकर्त्यांच्या या शिबिरांत ज्येष्ठ नेते शरद पवार हे स्वतः मार्गदर्शन करणार आहेत. एकीकडे शरद पवारांनी मे महिन्यात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका लागण्याचे केलेले भाकीत आणि दुसरीकडे राष्ट्रवादीचे राज्यभर शिबिरे घेण्याचे नियोजन या दोन्हीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचे भाकीत खरे ठरणार असल्याचा तर्क कार्यकर्ते लावत आहेत.

गटबाजीचा पाढाः या बैठकीत ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी शरद पवारांसमोर गटबाजीचा पाढाच वाचला. ‘बऱ्याच वर्षांनी साहेबांनी आज जमिनीवरच्या कार्यकर्त्यांना बोलावून चर्चा केली. भोर वेल्हा मुळशीत राष्ट्रवादीत मोठी गटबाजी सुरू आहे. कुणालाही तिसरी टर्म देऊ नये, अशी विनंती साहेबांना केली आहे. तालुक्यातील अनेक लोक संघटना आणि नेत्यांना मानत नाहीत. आघाडीचा धर्म असल्यामुळे काँग्रेस आमदार लक्ष देत नाहीत. भोर वेल्हा मुळशी तालुका अजितदादांकडे द्या, सुप्रियाताई सगळ्यांना समजुतदारपणा दाखवतात. पण दादा सगळ्यांना ओळखून आहेत. ते सगळ्यांना नीट करतील, असे साहेबांना सांगितले,’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते शंकर भुरूक यांनी सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!