लोकसभेच्या २२ जागांवर शिंदे गटाचा दावा, भाजप-शिवसेनेत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता!


मुंबईः  आगामी लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपावरून भाजप आणि शिवसेनेत (शिंदे गट) वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने २०१९ मध्ये लढवलेल्या २३ पैकी २२ जागांवर दावा सांगितला आहे. त्यामुळे पक्षविस्तारासाठी कायम आक्रमक भूमिका घेणारा भाजप शिंदे गटाच्या या दाव्यावर आता काय भूमिका घेतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी शिवसेनेच्या (शिंदे गट) सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत लोकसभेच्या जागांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत लोकसभेच्या २२ जागा लढवण्याबाबत चर्चा करण्यात आली. लोकसभेच्या या २२ जागांवर आमचा नैसर्गिक हक्क आहे, असे शिंदे गटाचे नेते खा. राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी २०२४ मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. प्रत्येक राजकीय पक्ष आपापली रणनीती तयार करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी रात्री शिवसेनेच्या (शिंदे गट) खासदारांची बैठक बुधवारी रात्री वर्षा बंगल्यावर झाली.

 या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा करण्यात आली. आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) २२ जागा लढवणार असल्याचे सांगण्यात आले. या बैठकीत शिवसेनेने लढवायच्या एकूण जागांचा आढावा घेण्यात आला.

शिवसेनेने मागच्या लोकसभा निवडणुकीत ज्या २२ जागा लढवल्या होत्या, त्या सर्व २२ जागांसाठी तयारी करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. विद्यमान १३ खासदारांसह इतर जागांचाही या बैठकीत आढावा घेण्यात आला. सर्व लोकसभा मतदारसंघातील विकास कामांना गती देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला, असे खा. राहुल शेवाळे म्हणाले.

 भाजप आणि शिवसेनेने २०१९ ची लोकसभा निवडणूक युती करून लढवली होती. त्यावेळी महाराष्ट्रात भाजपने २५ तर शिवसेनेने २३ जागा लढवल्या होत्या. लढवलेल्या जागांपैकी भाजपने २३ तर शिवसेनेने १८ जागांवर विजय मिळवला होता. शिवसेनेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्या १८ खासदांपैकी सध्या १३ खासदार शिंदे गटासोबत आहेत तर ६ खासदार उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत.

जागा वाटपाचा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नसताना शिवसेनेने (शिंदे गट) मागच्या निवडणुकीतील फॉर्म्युलाच पुढच्या म्हणजे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कायम राहील असे गृहित धरून तयारी सुरू केलेली असल्यामुळे शिवसेनेच्या या दाव्यावर भाजप आता कसा प्रतिसाद देते? शिंदे गटाचा २२ जागांवरील दावा मान्य करते की नाही? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

२०१९ च्या निवडणुकीचेच सूत्र राहील-किर्तीकरांचा दावा

लोकसभेच्या २२ जागा या आमच्याच आहेत. त्यामुळे या जागांवर वेगळा दावा करण्याचा प्रश्नच येत नाही. २०१९ मध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र असताना जागावाटप झाले तेव्हा आम्ही २३ तर भाजपने २६ जागा लढवल्या होत्या. यापैकी २२ जागांवर भाजपचे तर १८ जागांवर आमचे खासदार निवडून आले. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत हेच सूत्र राहील. त्यादृष्टीने आमची तयारी झाली आहे, असा दावा ज्येष्ठ खासदार गजानन किर्तीकर यांनी केला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!