राज्यपाल कोश्यारींनी विद्यापीठात दिले आरएसएसच्या तत्वज्ञानाचे धडे, म्हणालेः हमारे आरएसएस के गोलवलकर गुरूजी….


औरंगाबादः महाराष्ट्रातील विद्यापीठांचे कुलपती आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील भाषण वादग्रस्त ठरले. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत ‘शिवाजी तो पुराने जमाने के आदर्श थे’ म्हणणाऱ्या कोश्यारींनी गोळवलकरांचा सन्मानाने उल्लेख करत विद्यापीठातील विद्यार्थ्यांना ‘हमारे आरएसएस के गोलवलकर गुरूजी…’ म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) तत्वज्ञानाचे धडे दिले. व्हिजनरीसोबतच मिशनरी असण्याचे महत्व पटवून देताना राज्यपाल कोश्यारी यांनी आरएसएसचे लोक किती ध्येय्याने झपाटलेले असतात, हे विद्यार्थ्यांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने चालणाऱ्या विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभातच कोश्यारींनी जाहीरपणे आरएसएसच्या तत्वज्ञानाचे धडे दिल्यामुळे समारंभाला उपस्थित अनेकांच्या भुवया उंचावल्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षांत समारंभ शनिवारी संपन्न झाला. नालंदा विद्यापीठाचे कुलपती आणि परम संगणकाचे जनक डॉ. विजय भटकर हे समारंभाचे प्रमुख अतिथी होते. विद्यापीठाचे कुलपती आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या दीक्षांत समारंभात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप नेते तथा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना मानद डी.लिट. प्रदान करण्यात आली.

दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षीय भाषणात बोलताना राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, ‘व्हिजनरीसोबतच आम्हाला मिशनरी बनावे लागते. अर्थात त्या कामाच्या मागे पागल होऊन लागावे लागते. कोणत्याही कामाच्या मागे जर पागल होऊन लागला तर, पागल म्हणजे…आमच्या आरएसएसचे गुरूजी होते गोळवलकर.. जेव्हा लोक त्यांना म्हणत असत की, अरे हे आरएसएसवाले पागल आहेत, तर ते म्हणत होते की आम्ही पागल आहोत. कुणी तरी म्हटले का पागल आहात? म्हणाले पंजाबीमध्ये ‘गल’चा अर्थ होतो रहस्य. त्या रहस्याला ‘गल’ म्हणतात आणि ‘पा’ म्हणजे मिळवणे. म्हणाले ज्याने रहस्य प्राप्त केले, सिक्रेट प्राप्त केले, तो पागल’,  असे सांगत राज्यपाल कोश्यारी यांनी अश्याप्रकारचे ‘पागल’ किती जण बनू इच्छिता? असा सवाल दीक्षांत समारंभात उपस्थित विद्यार्थ्यांना केला.

हेही वाचाः शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत राज्यपाल कोश्यारी म्हणाले, शिवाजी जुन्या काळातील आदर्श, नितीन गडकरी तर…

शिवाजी तर जुन्या युगाची गोष्टः आम्ही जेव्हा शिकत होतो, मिडलमध्ये, हायस्कूलमध्ये तेव्हा आमचे शिक्षक आम्हाला निबंध देत होते की हु इज यूवर फेवरिट हिरो? तुमचा आवडता नेता कोण आहे?  त्यावेळी ज्याला सुभाषचंद्र बोस चांगले वाटत होते, ज्याला नेहरू चांगले वाटत होते, कुणाला गांधीजी चांगले वाटत होते. तर मला असे वाटते की जर तुम्हाला कुणी विचारले की तुमचा आयकन कोण?  तुमचा फेवरिट हिरो कोण? तर बाहेर जाण्याची गरज नाही. येथे महाराष्ट्रातच तुम्हाला मिळून जातील. शिवाजी तर जुन्या युगातील गोष्ट आहे. नव्या युगाची गोष्ट सांगत आहे. येथेच मिळतील. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरीपर्यंत… सगळे येथेच मिळतील, असे कोश्यारी म्हणाले. याच समारंभात राज्यपाल कोश्यारी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची तोंडभरून स्तुतीही केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!