राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राजीनामा देणार, ‘निरोपाच्या भाषे’त स्वतःच दिली माहिती


मुंबईः महापुरूषांबद्दल आक्षेपार्ह आणि अपमानास्पद विधाने करून कायम वादाच्या भोवऱ्यात राहिलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा देण्याची मानसिक तयारी केली आहे. आपल्याला राजकीय जबाबदारीतून मुक्त व्हायची इच्छा असल्याचे त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडेही बोलून दाखवली आहे. राजभवनाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे. ही माहिती देताना कोश्यारी यांनी निरोपाची भाषाच वापरली आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी १९ जानेवारी रोजी मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यावेळी भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांच्याकडे राजकीय जबाबदारीतून मुक्त होण्याची आपली इच्छा बोलून दाखवली असल्याचे राजभवनाने म्हटले आहे.

 महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही, अशी निरोपाची भाषाच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरून पायउतार होण्याचा निश्चय त्यांनी मनोमन केल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘माननीय प्रंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन आणि चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे आणि आशा की या संदर्भात देखील मला त्यांचा आशीर्वाद मिळत राहील,’ असे भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे.

राज्यपालांविरोधात महाराष्ट्रात पहिल्यांदाच आंदोलने

राज्यपाल कोश्यारी हे महापुरूषांबद्दल आक्षेपार्ह आणि अपमानास्पद वक्तव्ये करून कायम वादाच्या भोवऱ्यात राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात महाराष्ट्रभर आंदोलनेही झाली आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात राज्यपालांच्या विरोधात कधीच आंदोलने झाली नव्हती. महाविकास आघाडीने त्यांच्या विरोधात डिसेंबर महिन्यात महामोर्चाही काढला होता.

राजीनाम्याची अनेकदा मागणी

महापुरूषांबद्दल आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्ये केल्यामुळे राज्यपाल कोश्यारी यांच्या राजीनाम्याची अनेकदा मागणी झाली आहे. त्यासाठी आंदोलनेही झाली आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार अशा सर्वच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या राजीनाम्याची अनेकदा मागणी केली. मात्र त्यांच्या या मागणीवर कोश्यारींकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नव्हता. आता ते स्वतःहोऊनच राजीनामा देऊन महाराष्ट्राचे राजभवन सोडून जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोश्यारींची वादग्रस्त वक्तव्ये

  • औरंगाबादेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बोलताना राज्यपाल कोश्यारी यांनी ‘शिवाजी तो पुराने जमाने के आदर्श थे’ असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावरून राज्यभर संतापाची लाट उसळली होती. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्या विरोधात राज्यभर आंदोलने झाली.
  • त्याआधी त्यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. सावित्रीबाईंचे लग्न दहाव्या वर्षी झाले होते. तेव्हा ज्योतिबा फुले १३ वर्षांचे होते. लग्न झाल्यानंतर दहा वर्षाची मुलगी आणि तेरा वर्षाच्या मुलाने काय केले असेल? असे वक्तव्य त्यांनी अंगविक्षेप करत केले होते. त्यावरूनही मोठा वाद निर्माण झाला होता.
  • औरंगाबादेतच एका कार्यक्रमात बोलताना राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. चाणक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारणार? समर्थ रामदासाशिवाय शिवाजीला कोण विचारणार? असे ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरूनही वादंग माजले होते.
  • राज्यपाल कोश्यारी यांनी मुंबईबाबतही वादग्रस्त वक्तव्य केले होते. गुजराती आणि राजस्थानी लोक निघून गेले तर तुमच्याकडे पैसा कुठून येईल? असे मी महाराष्ट्राच्या लोकांना कधी कधी सांगत असतो. ते जर निघून गेले तर मुंबई देशाची आर्थिक राजधानीही राहणार नाही, असे कोश्यारी म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरही टिकेची झोड उठल्यानंतर त्यांनी माफी मागितली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!