राज्यपालांचा आमदार-खासदार समर्थकांना धक्का, विद्यापीठ अधिसभेवर ९ ‘अनपेक्षित’ चेहऱ्यांची वर्णी!


औरंगाबादः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेवर राज्यपाल नामनिर्देशित सदस्य होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या आणि आमदार-खासदार-मंत्र्यांकडून जोरदार फिल्डिंग लावून बसलेल्या इच्छुकांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी चांगलाच धक्का दिला असून विद्यापीठाच्या अधिसभेवर ९ अनपेक्षित चेहऱ्यांची वर्णी लावली आहे. आता फक्त एका सदस्याचे नामनिर्देशन करणे बाकी आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्याच्या कलम २८ (२) (प) आणि ३० (४) (ग) अन्वये  राज्यपालांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेवर दहा सदस्यांचे नामनिर्देशन करण्यात येते. निवडणुकीच्या राजकारणात तग धरू न शकणारे अनेक जण आमदार-खासदार आणि मंत्र्यांकडून फिल्डिंग लावून अधिसभेवर नामनिर्देशित सदस्य होण्यासाठी मोर्चेबांधणी करतात. यंदाही विद्यापीठाच्या राजकारणात सक्रीय असलेले अनेक जण मार्गाने अधिसभेवर जाण्यासाठी इच्छूक होते.

औरंगाबाद जिल्ह्याच्या राजकारणावर सद्यस्थितीत वर्चस्व असलेल्या एकनाथ शिंदे गट आणि भाजपच्या आमदारांकडून अनेक इच्छुकांनी अधिसभेवर नामनिर्देशित होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधले होते. काही जणांनी तर थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही फिल्डिंग लावली होती. मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या इच्छुकांपैकी एकालाही अधिसभेव संधी दिली नाही.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी  अरविंद वाल्मिक नरोडे, ऍड. अरविंद केंद्रे, केदार राहणे, मनोज शेवाळे, अजय धोंडे, विवेक पालवणकर, चत्रभुज गोडबोले, रविंद्र सासमकर आणि देविदास पाठक या ९ जणांची वर्णी लावली आहे. राज्यपालांनी नामनिर्देशित केलेले हे नऊच्या नऊ चेहरे विद्यापीठाच्या राजकारणात किंवा विद्यार्थी चळवळीत कधीही दिसलेले नाहीत. शैक्षणिक क्षेत्रातही ते कधी चर्चिले गेलेले नाहीत. एकनाथ शिंदे गट किंवा भाजपच्या राजकारणातही ते कधी दिसलेले नाहीत. थेट ‘रेशमी बाग’ कनेक्शनमुळेच या नऊ ‘अनपेक्षित’ चेहऱ्यांची विद्यापीठाच्या अधिसभेवर वर्णी लागल्याचे सांगण्यात येते.

 या नामनिर्देशित अधिसभा सदस्यांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील चार, बीड आणि जालना जिल्ह्यातील प्रत्येकी दोन आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील एका जणाचा समावेश आहे. आता नामनिर्देशन शिल्लक राहिलेल्या एका जागेसाठी अनेक जण सर्वशक्तीनिशी फिल्डिंग लावत आहेत. ही जागा जरी आपल्या पदरात पडावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!