नव्या नोटांवर कुणाचा फोटो?:  मनीष तिवारी म्हणाले- डॉ. बाबासाहेब आंबेडकर; नितेश राणे म्हणतात- छत्रपती शिवाजी महाराज!

नवी दिल्ली/मुंबईः दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भारतीय चलनी नोटांवर गणपती आणि लक्ष्मीचे फोटो छापण्याची मागणी केल्यानंतर हे प्रकरण चांगलेच रंगू लागले आहे. भारतात ज्या नव्या नोटा छापल्या जातील, त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो का छापला जाऊ शकत नाही?  एका बाजूला महात्मा गांधी आणि दुसऱ्या बाजूला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो छापला पाहिजे, असे पंजाबमधील काँग्रेसचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी म्हटले आहे. तर महाराष्ट्रातील भाजपचे आमदार नितेश राणे यांनी नोटांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो छापण्याचा आग्रह धरला आहे.

 देशाच्या अर्थव्यवस्थेला देवी-देवतांचे आशीर्वाद मिळाले पाहिजे, यासाठी नव्या चलनी नोटांवर गणपती आणि लक्ष्मीचा फोटो छापा, अशी मागणी अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी केल्यानंतर यावरून देशाचे राजकारण चांगलेच पेटले आहे. विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून यावर वेगवेगळ्या सूचना आणि प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. अनेक जण नोटांचे फोटो फोटोशॉप करून नव्या नोटांवर कोणाचा फोटो छापायला हवा? याबाबतच्या मागण्या करत आहेत.

काँग्रेसचे पंजाबमधील खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी  नव्या भारतीय चलनी नोटांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो छापण्याची मागणी केली आहे. नव्या भारतीय चलनी नोटांवर एका बाजूला थोर महात्मा गांधी आणि दुसऱ्या बाजूला डॉ. आंबेडकरांचा फोटो छापण्याची मागणी केली आहे. नव्या भारतीय नोटांवर या दोघांचे फोटो म्हणजे अहिंसा, संविधानवाद आणि समतावादाचा एका अद्वितीय संघामध्ये विलय होईल, जे आधुनिक भारतीय प्रतिभेचे उत्तम प्रकारे प्रतिनिधीत्व असेल, असे तिवारी यांनी म्हटले आहे.

 दुसरीकडे महाराष्ट्रातील भाजप आमदार नितेश राणे यांनी २०० रुपयाची नोट फोटोशॉप करून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावला आहे. हा फोटो ट्विट करत नितेश राणे यांनी ‘हे परफेक्ट आहे’ असे म्हटले आहे. या मुद्यावरून सोशल मीडियावर भाजप आणि आम आदमी पार्टीचे (आप) समर्थक यांच्यात तुंबळ धुमश्चक्री सुरू आहे. भाजपने याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीचे समर्थक करू लागले आहेत. राष्ट्रीय लोकदलाचे प्रमुख आणि राज्यसभा खासदार जयंत चौधरी यांनी गुरू गोविंदसिंग  यांचा फोटो नव्या नोटांवर छापण्याची मागणी केली आहे.

भारताची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आणि देशाला विकसित करण्यासाठी आपल्याला देवीदेवतांचे आशीर्वाद हवे आहेत, असे सांगत अरविंद केजरीवाल यांनी भारतीय चलनी नोटांवर गणपती आणि लक्ष्मीचे फोटो छापण्याची मागणी केली होती. याबाबत ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहिणार असल्याचे केजरीवाल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले होते. केजरीवाल यांची ही मागणी म्हणजे ढोंग असल्याची टीका भाजपने केली आहे. हिंदुत्वाच्या मुद्यावर यू-टर्नचे हे ढोंग असल्याचे भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!