महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संयुक्त पूर्वपरीक्षेचे हॉलतिकिट संकेतस्थळावर उपलब्ध


मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार, ३० एप्रिल रोजी होणाऱ्या नियोजित महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ करिता उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत, असे प्रसिद्धीपत्रक आयोगामार्फत जारी केले आहे.

आयोगाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.

परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीडतास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित रहावे लागणार आहे.

प्रत्यक्ष परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी एक तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वतःच्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अथवा यासंदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही.

कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सूचनांचे तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांचे पालन करणे अनिवार्य आहे. आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचना, प्रवेश प्रमाणपत्रावरील सूचना तसेच आयोगाच्या संकेतस्थळावरील ‘Guidelines for Examination’ या सदराखाली उपलब्ध असलेल्या ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्या वेळी उमेदवारांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सूचना’ यांचे उमेदवारांनी पालन करणे अनिवार्य असेल. या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवारांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच, प्रचलित नियम / कायद्यातील तरतुदीनुसारही कारवाई करण्यात येईल.

प्रवेशप्रमाणपत्र मिळविण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास उमेदवारास आयोगाच्या contact-secretary@mpsc.gov.in व support-online@mpsc.gov.in या ईमेल अथवा १८००१२३४२७५ किंवा ७३०३८२१८२२ या दूरध्वनी क्रमांकावरुन विहित वेळेत आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल, असेही या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!