विधानसभा निवडणूकः मतमोजणीच्या कलात गुजरातमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत, हिमाचल प्रदेशात काँग्रेसची मुसंडी!


नवी दिल्लीः गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू असून मतमोजणीच्या कलात गुजरातमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. तर हिमाचल प्रदेशात भाजपला मागे टाकून काँग्रेसने मोठी आघाडी घेतली आहे.

गुजरातमध्ये विधानसभेच्या १८२ जागा आहेत. गेल्या २७ वर्षांपासून गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे. जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये गुजरातमध्ये भाजप पुन्हा सत्तेत येण्याची भविष्यवाणी केली आहे. मतमोजणीच्या कलात भाजपने १५५ जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेस १८ जागांवर  तर आप ६ जागांवर आघाडीवर आहे. ३ जागांवर अपक्ष आघाडीवर आहेत.

मतमोजणीच्या कलात भाजपला प्रचंड बहुमत मिळत असल्याचे दिसत आहे. त्यावर गुजरातमध्ये प्रो-इन्कम्बसी आहे. आम्ही गुजरातमध्ये एक नवीन रेकॉर्ड प्रस्थापित करत आहोत कारण राज्याच्या लोकांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर मोठा विश्वास आहे.

गुजरातच्या जनतेने महागाई, बेरोजगारीसारख्या प्रमुख मुद्दयांना बगल देऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावावरच भाजपला मतदान केले आहे, हे मतमोजणीच्या कलावरून स्पष्ट झाले आहे. गुजरातमध्ये आपच्या एन्ट्रीमुळे काँग्रेसच्या मतांचे मोठ्या प्रमाणावर विभाजन झाल्याचे पहायला मिळत आहे. त्याचा अप्रत्यक्ष फायदा भाजपलाच झाल्याचे दिसत आहे.

याचा अर्थ असाही आहे की, भाजपने गुजरातमध्ये जरूर विकास केला असेल, म्हणून तर गुजरातची जनता भाजपला एवढे प्रचंड बहुमत देत असल्याचे दिसत आहे. मतमोजणीचे कल पाहता भाजपला एक्झिट पोलच्या अंदाजापेक्षा जास्त जागा मिळू शकतील, असे चित्र आहे.

 हिमाचल प्रदेशः हिमाचल प्रदेशात विधानसभेच्या ६८ जागा आहेत. त्यापैकी काँग्रेसने स्पष्ट बहुमतापेक्षा जास्त म्हणजेच ३९ जागावर आघाडी घेतली आहे. येथे भाजप २६ जागांवरील आघाडीपर्यंत घसरण झाली आहे. ३ जागांवर अपक्षही आघाडीवर आहेत. सुरूवातीच्या मतमोजणीच्या कलात भाजप आणि काँग्रेसमध्ये काट्याची टक्कर सुरू होती. दोन्ही पक्ष समसमान जागांवर आघाडीवर होते. नंतर मात्र भाजपला मागे टाकत काँग्रेसने मुसंडी मारली आहे. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशात भाजपला ४४ जागा मिळाल्या होत्या तर काँग्रेसला केवळ २१ जागा मिळाल्या होत्या.

 हिमाचल प्रदेशात पिछेहाट होताना दिसताच भाजपने गुप्त हालचाली सुरू केल्या आहेत. काँग्रेसची सरशी होऊन ते सत्ता स्थापन करण्याच्या स्थितीत दिसू लागताच आता भाजपकडून हिमाचल प्रदेशात ‘ऑपरेशन लोटस’ राबविले जाण्याची शक्यता आहे.

या शक्यतेमुळे सत्तेच्या समीप आलेला काँग्रेसही सावध झाला असून हिमाचल प्रदेशातील काँग्रेस आमदारांना राजस्थानच्या जयपूरमधील एका रिसॉर्टवर ठेवले जाण्याची शक्यता आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी शिमल्यात दाखल झाल्या आहेत. त्या स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

भाजपनेही सरकार स्थापन करण्याच्या जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. भाजप सरचिटणीस विनोद तावडे यांना वाटाघाटीसाठी शिमल्यात पाठवले आहे. सत्ता स्थापनेत तीन अपक्षांची भूमिका महत्वाची ठरणार असल्याचे सध्याचे तरी चित्र आहे. भाजपकडून काँग्रेस आमदारांत फाटाफूट घडवून आणली जाण्याचीही शक्यता आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!