सावरकरांवरील वक्तव्याचा वादः एकनाथ शिंदे गटाच्या फिर्यादीवरून राहुल गांधींविरोधात एफआयआर दाखल

मुंबईः काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या ठाण्यातील नेत्या वंदना सुहास डोंगरे यांच्या फिर्यादीवरून ठाणेनगर पोलिसांनी राहुल गांधी यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे स्थानिक नागरिकांच्या भावना दुखावल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी जे वक्तव्य केले आहे, त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान झाला आहे आणि त्यामुळे स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या आहेत, असे वंदना सुहास डोंगरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून ठाणे नगर पोलिसांनी राहुल गांधी यांच्या विरोधात भादंविच्या कलम ५०० आणि ५०१ अन्वये एफआयआर नोंदवण्यात आला आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी महाराष्ट्रात राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा रोखावी, अशी मागणी आधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल वक्तव्य केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात बोलताना राज्यातील जनता कोणत्याही परिस्थितीत सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती.

बिरसा मुंडा जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी विनायक दामोदर सावरकर यांना माफीवीर म्हटले होते. त्यावरून वाद झाल्यानंतर गुरूवारी त्यांनी अकोल्यात पत्रकार परिषद घेऊन सावरकरांनी तुरूंगात असताना इंग्रजाना लिहून दिलेला माफीनामाच दाखवला होता आणि या माफीनाम्यातील ओळी वाचून दाखवल्या होत्या. मी तुमचा नोकर म्हणून राहू इच्छितो, असे सावरकरांनी या माफीनाम्यात म्हटल्याचे राहुल गांधी म्हणाले होते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सावरकरांनी इंग्रजांना लिहून दिलेला माफीनामा वाचायला हवा, असेही राहुल गांधी म्हणाले होते.

राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर सावरकरांचे नातू रंजीत सावरकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सावरकरांचा अपमान केल्यामुळे राहुल गांधी यांच्या विरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करणार असल्याचे म्हटले होते. आपल्या राजकीय फायद्यासाठी राहुल गांधी यांनी हे विधान केल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

राहुल गांधींच्या वक्तव्याशी शिवसेना असहमतः शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आम्ही सावरकरांचा आदर करतो. त्यामुळे राहुल गांधींच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचे म्हटले होते. राहुल गांधी यांच्या वक्तव्याबद्दल तुम्ही आम्हाला विचारत असाल तर जम्मू काश्मीरमध्ये पीडीपीसोबत भाजप सत्तेत का होती? हेही भाजपने सांगितले पाहिजे. पीडीपीने कधीही भारत माता की जयचे नारे दिले नाही, असा दावाही उद्धव ठाकरे यांनी केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!