राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवात ‘अव्यवस्थेच्याच क्रीडा’: खेळाडूंवर रात्र जागून काढत सकाळी डोळे चोळत स्पर्धेला सामोरे जाण्याची वेळ!


औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या दोन हजारांहून अधिक खेळाडूंना स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी विद्यापीठाचे ढिसाळ नियोजन आणि अव्यवस्थेचा फटका बसला. रात्री राहण्यासाठी जागा आणि झोपण्यासाठी गाद्याच उपलब्ध नसल्यामुळे रात्री दोन ते तीन वाजेपर्यंत खेडाळूंना ‘जागते रहो’चा खेळ खेळावा लागला आणि रात्रभर जागरण करून झाल्यानंतर सकाळीच स्पर्धेला सामोरे जावे लागले. त्याचा परिणाम अनेक खेळाडूंच्या प्रदर्शनावर झाल्याचे पहायला मिळाले.

 राजभवनाच्या वतीने डॉ़ बाबासाहेब आंबेडक मराठवाडा विद्यापीठात ३ ते ७ डिसेंबर या कालावधीत राज्य क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे .  पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवात खो-खो, कबड्डी, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, अ‍ॅथलेटिक्स या पाच प्रकारात स्पर्धा रंगणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यातील २२ विद्यापीठाचे २ हजार १२० खेळाडू आहेत. त्यात १ हजार ११७ पुरूष तर १ हजार ३ महिला खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंसोबतच ३०२ प्रशिक्षकही आले आहेत. त्यात २६८ पुरूष प्रशिक्षक तर ३४ महिला प्रशिक्षकांचा समावेश आहे.

हे खेळाडू आणि  प्रशिक्षक २ डिसेंबरपासूनच विद्यापीठात येणे सुरू झाले. ते येथे आल्यानंतर मात्र त्यांना पहिल्याच दिवशी अव्यवस्थेचा फटका बसला. खेळाडूंना निवासव्यवस्था तसेच झोपण्यासाठी गादयाच उपलब्ध नसल्यामुळे रात्र जागून काढावी लागली. याबाबत आरडाओरड, गोंधळ झाल्यानंतर रात्री दोन वाजेच्या सुमारास गादया उपलब्ध करून देण्यात आल्या.  ज्या गाद्या उपलब्ध करून देण्यात आल्या, त्या झोपण्यासारख्या नव्हत्या. त्यामुळे अनेकांनी जमिनीवर झोपण्याचाच पर्याय निवडावा लागला. ज्या ठिकाणी खेळाडूंच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली होती, तेथे पिण्याचे पुरेसे पाणीही नसल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी खेळाडूंना बाटल्या हातात घेऊन भटकंती करावी लागली. सकाळी नाष्टा आणि अंडीही पुरवण्यात आली नसल्याची तक्रार अनेक खेळाडूंनी केली आहे.

मंत्र्यांच्या पीएंचा फोन आल्यावर हालली यंत्रणाः चौकशा, विनंत्या आणि तक्रार करूनही खेळाडूंसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत नसल्यामुळे खेळाडू संतापले. गोंडवणा विद्यापीठाच्या खेळाडूंनी थेट त्यांच्या विद्यापीठाचे कुलगुरू आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे तक्रारींचा पाढा वाचला. रात्री बारा वाजेपर्यंत कोणत्याच सुविधा न मिळाल्यामुळे  मुनगंटीवार यांच्या स्वीय सहायकांनी विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दयानंद कांबळे यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधून त्यांना धारेवर धरले आणि मग कुठे विद्यापीठाची यंत्रणा कामाला लागली. दीड- पाऊणे दोन वाजेच्या सुमारास कशाबशा गाद्या उपलब्ध करून देण्यात आल्या. त्याही सुस्थितीत नव्हत्या. हा प्रकार घडल्याच्या वृत्तास डॉ. कांबळे यांनी दुजोरा दिला.

असा प्रकार चुकीचाच, चौकशी करू-क्रीडा मंत्रीः क्रीडा व युवक कल्याणमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीतच या क्रीडा महोत्सवाचे आज उद्घाटन झाले. पत्रकारांनी महाजन यांना घडल्याप्रकाराबद्दल विचारले असता याबाबत आपल्याला माहिती नाही. परंतु माहिती घेतो आणि चौकशी करतो, असे महाजन म्हणाले. मुळात असा प्रकार होणेच चुकीचे आहे. स्पर्धा आधीपासूनच ठरलेल्या असल्यामुळे नियोजनही आधीपासूनच होणे आवश्यक होते. या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे महाजन म्हणाले.

आता असे होणार नाही- कुलगुरू डॉ. येवलेः कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनीही हा प्रकार घडल्याचे मान्य केले. या प्रकाराबाबत माहिती मिळताच चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यापीठाच्या सर्व संचालकांची तत्काळ बैठक घेऊन अडचणी जाणून घेण्याच्या सूचना कुलसचिवांना देण्यात आल्या आहेत. यासाठी स्थापन केलेल्या समित्या कुठे कमी पडल्या, याबाबतचा अहवाल मागवण्यात आल्याचेही येवले म्हणाले.

महोत्सवाचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन, हॉकीपटू धनराज पिल्ले आकर्षण

दरम्यान, या क्रीडा महोत्सवाचे शनिवारी थाटात उद्घाटन झाले. विद्यापीठाच्या फुटबॉल मैदानावर हा सोहळा झाला. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागत कराड यांच्या हस्ते मशाल पेटवून स्पर्धेचे उद्घाटन झाले. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी अध्यक्षस्थान भूषविले. यावेळी क्रीडा व युवक कल्याणमंत्री गिरीश महाजन, प्रख्यात हॉकीपटू धनराज पिल्ले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.कारभारी काळे, प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. भगवान साखळे, राजभवन समितीचे अध्यक्ष डॉ.दिपक माने, सदस्य डॉ.दिनेश पाटील, डॉ.मोहन अमरुळे, क्रीडा संचालक डॉ.दयानंद कांबळे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण तसेच तुळजापूर-औरंगाबादला आलेल्या मशालीने क्रीडा महोत्सवाची दीप प्रज्वलित करण्यात आली.

क्रीडा विद्यापीठ औरंगाबादलाच हवे-कराडः मराठवाडयातील खेळाडूंनी राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविलेला आहे. त्यामुळे मराठवाडयातच राज्य क्रीडा विद्यापीठावर हक्क असून राज्यशासनाने औरंगाबादेत राज्य क्रीडा विद्यापीठ स्थापन झाले पाहिजे, असे कराड म्हणाले. यापूर्वीच्या सरकारने औरंगाबादजवळ करोडीजवळ जागा उपलब्ध असतांनाही आमचे हक्काचे विद्यापीठ पळवले. आता ते पुनःश्च औरंगाबादला झाले पाहिजे तसेच ’साई’मध्ये विद्यापीठातील खेळाडूंना सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील, असेही डॉ.कराड म्हणाले.

पॅशन, डेडिकेशन, हार्डवर्क करा- धनराज पिल्लेः कोणत्याही खेळात विजेतेपद पटकावयाचे असेल तर खेळाडूकडे ’पॅशन, डेडीकेशन व हार्डवर्क’ या त्रिसुत्रीची आवश्यकता आहे, असे प्रख्यात हॉकीपटू धनराज पिल्ले यांनी केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!