नाट्यशास्त्राचा ‘बलात्कारी’ प्राध्यापक डॉ. अशोक बंडगर २२ दिवसांपासून मोकाटच, आता बडतर्फी टाळण्यासाठी फिल्डिंग!


छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद): वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा या वेडाने झपाटलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. अशोक बंडगर याच्याविरोधात विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल होऊन तब्बल २२ दिवस उलटले तरी बेगमपुरा पोलिसांना त्याचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. जिल्हा  सत्र न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामिनासाठीचा अर्ज फेटाळून लावला आहे. दरम्यान, विद्यापीठ प्रशासनाकडून आपल्याविरोधात बडतर्फीची कारवाई होऊ नये, यासाठी बंडगरने खास दूतांमार्फत फिल्डिंग लावल्याची माहितीही समोर येत आहे.

नाट्यशास्त्र विभागातील प्रा. डॉ. अशोक बंडगरच्या विरोधात त्याच्या पत्नीसह २५ एप्रिल रोजी बेगमपुरा पोलिस ठाण्यात भादंविच्या कलम ३७६(न), १०९, ११४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच बंडगर त्याची पत्नी आणि दोन मुलींसह फरार झाला. तेव्हापासून तो ‘फरार’च आहे.

 गुन्हा दाखल झाल्यानंतर अशोक बंडगरने अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती.  बेगमपुरा पोलिसांनी त्याच्या अटकपूर्व जामिनाला कडाडून विरोध केला. त्यामुळे १२ मे रोजी सत्र न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामिनासाठीचा अर्ज फेटाळून लावला. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतरही अशोक बंडगर पोलिसांना शरण आला नाही आणि बेगमपुरा पोलिसांनाही त्याचा ठावठिकाणा शोधता आलेला नाही.

अशोक बंडगरचा ठावठिकाणा शोधण्यासाठी बेगमपुरा पोलिसांनी त्याचे सर्व मोबाइल नंबर, आधार कार्डवर नवीन सीम कार्ड घेतल्यास ते सीम कार्ड आणि बँकेचे एटीएमही ट्रेसिंगला टाकले आहेत. परंतु गुन्हा दाखल झाल्यापासून अशोक बंडगरने आतापर्यंत एकदाही एटीएममधून पैसे काढले नाहीत किंवा स्वतःच्या मोबाइलवरून कुणाशीही संपर्क साधलेला नाही. त्यामुळे अशोक बंडगर नेमका लपला कुठे? हे शोधून काढणे अवघड झाले आहे. बेगमपुरा पोलिस बंडगरच्या ठावठिकाण्याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

गुन्हा दाखल झाल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने २५ एप्रिल रोजी अशोक बंडगरच्या निलंबनाचे आदेश काढले. निलंबन काळात मुख्यालय सोडता येणार नाही आणि कुठलीही रजा देय असणार नाही, अशा अटी निलंबन आदेशात आहेत. मात्र निलंबन आदेश जारी झाल्यापासून अशोक बंडगरने या निलंबन आदेशातील एकाही अटीचे पालन केलेले नाही. त्यामुळे त्याच्यावर बडतर्फीची टांगती तलवार आहे.

विद्यापीठ प्रशासन आपल्यावर बडतर्फीची कारवाई करू शकते, याचा अंदाज आल्यामुळे ही कारवाई टाळण्यासाठी अशोक बंडगरने आपल्या खास दूतांमार्फत जोरदार फिल्डिंग लावल्याची माहिती समोर येत आहे. ‘तुमचे काय ते सांगा, पण बडतर्फीची कारवाई करू नका,’ असा निरोप घेऊन अशोक बंडगरचे काही खास दूत विद्यापीठ प्रशासनाकडे घिरट्या घालत असल्याचे सांगण्यात येते. आता विद्यापीठ प्रशासन ‘मानवतेच्या दृष्टिकोनातून’ अशोक बंडगरच्या विरोधातील बडतर्फीची कारवाई टाळते की कठोर भूमिका घेत विद्यापीठातील त्याचा अध्याय संपवते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

बडतर्फीच्या मागणीवर अद्याप कारवाई नाहीः अशोक बंडगर याने निलंबन आदेश जारी झाल्याच्या दिवसापासूनच निलंबन आदेशातील एकाही अटीचे पालन न केल्यामुळे त्याच्या विरोधात बडतर्फीची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पंधरा दिवसांपूर्वीच कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे, मात्र या मागणीवर विद्यापीठ प्रशासनाने अद्याप कुठलीही कारवाई केलेली नाही.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!