वाळूजच्या पी.एम. विद्या मंदिरात शिक्षक-संस्थाचालकांच्या वादात विद्यार्थ्यांची शाळा भरली मैदानावर!


औरंगाबाद: वाळूज, रांजणगाव येथील पी. एम. ज्ञानमंदिर व ज्युनियर कॉलेजच्या संस्थाचालक आणि शालेय शिक्षकांतील वादाचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांना सोसावे लागत आहेत. संस्थाचालकांनी गेटची चावी उपलब्ध करून न दिल्याने आज सोमवारी विद्यार्थ्यांची शाळा चक्क मैदानावरच भरवण्याची वेळ आली. दोघांच्या वादात विद्यार्थ्यांवर भर उन्हात बसून ज्ञानार्जन करावे लागले.

महाराष्ट्र विद्यार्थी विकास असोसिएशन संचलित पी. एम. ज्ञानमंदिर शाळेस सन २००६-०७ मध्ये मान्यता मिळाली. त्यावेळी ८ शिक्षक, १ सेवक, १ लिपिक असे १० जण संचमान्यतेनुसार कार्यरत होते. सन २०१३-१४ मध्ये विद्यार्थी संख्या वाढल्याने १४ शिक्षक, २ सेवक, १ लिपिक असे १७ जणांना मान्यता मिळाली. यातच सन २०१४ मध्ये शाळेला अनुदान मिळण्यासंदर्भात शासनाचा अध्यादेश निघाला आणि प्रत्यक्षात सन २०१६ पासून २० टक्के अनुदान तत्त्वावर त्यावेळी कार्यरत शिक्षकांना पगार सुरू झाला. अन तेव्हापासून वादास सुरुवात झाली. कोणी शिक्षण विभागात दाद मागण्यास सुरुवात केली तर कोणी न्यायालयात जाण्याचा मार्ग स्वीकारला. हा वाद सुरू असतानाच प्रत्येकाने एकमेकांवर आरोप केले. त्याचा  दुष्परिणाम मात्र सोमवारी विद्यार्थ्यांना भोगावा लागला.

पी. एम. ज्ञानमंदिर शाळेने ग्रामविकास विद्यालय व सावित्रीबाई कनिष्ठ महाविद्यालयाचे मैदान वापरावयास घेतले होते. पी. एम. ज्ञानमंदिर शाळेत जाण्याचा मार्ग ग्रामविकास विद्यालय मैदानाच्या गेटजवळून होता. मात्र पी. एम. ज्ञानमंदिर शाळेच्या संस्थाचालकांनी जेथे शाळा सुरू आहे तेथील भिंत तोडून प्रवेश त्या मार्गाने सुरू केला. याची कल्पना विद्यार्थी तसेच शिक्षकांना नव्हती. सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास सर्वजण आल्यानंतर ग्रामविकास विद्यालय मैदानाचे गेट बंद असल्याने शाळेत कसे जावे हा पेच निर्माण झाला. यातच शाळेतील शिक्षकांनी भर उन्हात मैदानावरच शाळा भरवली.

विद्याथी मैदानात बसून शिक्षण घेत असल्याची माहिती प्रसारमाध्यमांना कळताच त्यांनी धाव घेतली. त्यानंतर संस्थाचालक आणि शिक्षकांचा वाद असल्याचे समोर आले. यातच ही माहिती मिळताच राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप विखे यांना कळतात त्यांनी शाळेत धाव घेऊन दोघांतमध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत शाळा सुटण्याची वेळ झाली होती. अखेर तोडगा निघून ग्रामविकास विद्यालय मैदानातून प्रवेश देण्याचा तसेच हा वाद आपापल्या स्तरावर सोडवण्याचा निर्णय घेण्यात आला. 

संस्थाचालकांचे गोलमाल उत्तरः याबाबत न्यूजटाऊनने संस्थाचालक काकासाहेब जाधव यांच्याशी संपर्क साधला असता आगोदर त्यांनी लिपिक आणि शिपाई यांच्यातील गैरसमजातून हा प्रकार झाल्याचे आणि कोणताही वाद नसल्याचे सांगितले. नंतर मात्र शनिवारी लिपिकाने शिपायाच्या हातून चाव्या हिसकावून घेतल्याचे मला कळले. त्यांच्यात हिसकाहिसकी झाली. शाळेच्या सगळ्यांकडे स्वतंत्र चाव्या आहेत. मुख्याध्यापक, लिपिक, शिपाई यांच्याकडेही चाव्या आहेत, असे जाधव म्हणाले. शिक्षक बोगस कामे करतात, असे सांगतानाच जे काही वाद आहेत, ते मिटवले जातील. दोन शिक्षकांना पगार मिळाले नाहीत म्हणून शिकवायचे थांबवू नका. मानधन घ्या आणि शिकवा, असे मी त्यांना सांगितले आहे, असे जाधव म्हणाले.

…तर कारवाई करू-शिक्षणाधिकारीः  संस्थाचालक आणि शिक्षकांच्या वादामुळे विद्यार्थ्यांना मैदानावर बसून शिक्षण घ्यावे लागत असल्याची माहिती मिळताच संबंधित केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांना पाठवून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. या वादामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असेल तर नक्कीच कारवाई करण्यात येईल. अधिकाऱ्यांच्या अहवालात दोषी असणाऱ्यांवर नक्कीच कारवाई करण्यात येईल, असे माध्यमिक शिक्षणाधिकारी एम.के. देशमुख म्हणाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!