‘चोर आले पन्नास खोके घेऊन…’ रॅप साँग म्हटले, संभाजीनगरच्या तरूणाला अटक; पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

मुंबई/संभाजीनगरः ‘चोर आले ५० खोके घेऊन, किती बघा चोर आले किती ओके होऊन…’  हे गाणे म्हणणाऱ्या तरूणाला छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) पोलिसांनी त्याच्या घरातून अटक केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून ही माहिती देताना ५० खोके या वक्तव्याने जातीय तणाव किंवा धार्मिक तणाव निर्माण होता कसा? असा सवाल उपस्थित केला आहे.

 राम मुंगासे या नवोदित कलाकाराने ‘चोर आले ५० खोके घेऊन, किती बघा चोर आले किती ओके होऊन… छक्क्यांच्या मिशीला ताव बघा, यांनी पाठिवर दिला आपल्या घाव बघा…पळपुटे चोर साले छाती म्हणे छपन्न, चोरलाय पक्ष यांनी चोरतील हे बाप पण…’  हे व्हिडीओ साँग गायले आहे. राम मुंगासेच्या या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.  मात्र वेगाने व्हायरल होत असलेले हे गाणे म्हणणे राम मुंगासेच्या चांगलेच अंगलट आले असून छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

 राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांच्या या कारवाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘ राम मुंगासे या नवोदित कलाकाराने एक गाणे म्हटले म्हणून त्याच्या घरातून संभाजीनगर पोलिसांनी त्याला अटक केली व ते त्याला अंबरनाथ पोलिसांच्या हाती देतील. पण त्याचा गुन्हा काय? त्याने कोणाचे नाव देखील घेतले नव्हते. ५० खोके हे कोणाचे नाव आहे का? हे आधी पोलिसांनी स्पष्ट करावे. ५० खोके या वक्तव्याने जातीय तणाव किंवा धार्मिक तणाव निर्माण होतो कसा, हे पोलिसांनी सिद्ध करावे,’ असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

‘…म्हणजे संविधान पायदळी तुडवण्याचाच निर्णय झाला आहे, असे दिसते. आम्ही सगळे राम मुंगासे याच्या पाठिशी आहोत. संपूर्ण महाराष्ट्र त्याच्या पाठिशी उभा राहील. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटू शकत नाही. हे पोलिस राज नाही,’ असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

‘…हा सरकारचा कबुलीच जबाबच नाही का?’

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही पोलिसांच्या या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘ आपल्या रॅप साँगमध्ये कुणाच्याही नावाचा उल्लेख नसतानाही राम मुंगासे या तरूण कलाकाराला ५० खोके या शब्दामुळे अटक होत असेल तर हा सरकारचा कबुली जबाबच नाही का?  शिव्यांचे कुणीही समर्थन करत नाही, पण राज्यातील खुद्ध एका मंत्र्यानेच महिला लोकप्रतिनिधीला अर्वाच्च शिविगाळ केली तेव्हा कारवाई करण्याऐवजी सरकारने कानात बोटे घातली आणि डोळे बंद केले. ब्रिटिश राजवटीची आठवण करून देणारा हा धक्कादायक कारभार आहे,’ असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.

ज्या गाण्यासाठी राम मुंगासे या तरूणाला अटक झाली ते गाणे सोशल मीडियावर वेगावने व्हायरल होत आहे. जितेंद्र आव्हाड यांनी या गाण्याचा व्हिडीओ पोस्ट करत पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आव्हाड यांच्या ट्विटर हँडलवरही हे गाणे जबरदस्त व्हायरल होत आहे. ते गाणे असे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!