न्याय व्यवस्थेलाही अंकीत करण्याचे प्रयत्नः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा गंभीर आरोप

मुंबईः  केंद्रीय तपास यंत्रणा सरकारच्या पाळीव प्राण्याप्रमाणे वागत आहेत. ज्याच्या अंगावर जा म्हटले की त्याचा अंगावर जात आहे. केंद्रीय यंत्रणांची ही स्थिती असताना न्यायव्यवस्थेलाही अंकित करण्याचे प्रयत्न सुरू आहे. केंद्रीय कायदा मंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यांतून याचेच संकेत मिळत आहेत, असा गंभीर आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. देशातील लोकांनी या विरोधात आवाज उठवला पाहिजे, असेही ठाकरे म्हणाले.

पत्राचाळ घोटाळाप्रकरणी संजय राऊत यांना ईडीने केलेली अटक बेकायदेशीर ठरवत पीएमएलए न्यायालयाने बुधवारी त्यांना जामीन मंजूर केल्यानंतर राऊत यांनी आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी हा गंभीर आरोप केला. संजय राऊत यांना पुन्हा एकदा खोट्या गुन्ह्यात गोवून अटक केली जाऊ शकते, असे सांगत ठाकरे यांनी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

संजय राऊत हे शिवसेनेचे नेते आहेत, खासदार आहेत. सामनाचे कार्यकारी संपादक आहेत पण त्याचसोबत ते माझे जवळचे मित्र आहेत. मित्र तोच असतो जो संकटाच्या काळात न डगमगता लढत असतो. तसा हा लढणारा मित्र आहे. तुरूंगातील काळ त्यांच्यासाठी खडतर होता, तसा तो आमच्यासाठीही खडतर होता. कारण आम्ही एकाच कुटुंबातील आहोत, असे ठाकरे म्हणाले.

काल न्यायालयाने जो निकाल दिला, त्या निकालपत्रात अत्यंत परखडपणे आणि स्पष्टपणे काही निरीक्षणे नोंदवली आहेत. त्यातून हे स्पष्ट झाले आहे की संजय राऊत यांना बेकायदेशीर अटक करण्यात आली होती. यापुढे आणखी एखाद्या प्रकरणात गोवून त्यांना अटक करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

मागील ८-१५ दिवसांमधील केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजीजू यांची केलेली वक्तव्ये केंद्र सरकार आता न्याय देवतेलाही आपल्या नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे की काय, असे दाखवणारी आहेत. त्यांनी न्यायवृंदावरच शंका उपस्थित केली आहे. एकूणच सर्वसामान्यांच्या आशेचा किरण न्यायलय असतो. केंद्र सरकार जर न्यायालयच आपल्या बुडाखाली घेण्याचा प्रयत्न करत असेल तर देशातील तमाम जनतेने त्याचा विरोध केला पाहिजे, असेही ठाकरे म्हणाले.

मला जे भोगायचे ते भोगले, कोणाही विषयी कटुता नाही- संजय राऊतः काल न्यायालयाने ज्या प्रकारचा निकाल दिला आहे, त्यामुळे देशात चांगले वातावरण तयार झाले आहे. मला ईडी किंवा अन्य कोणाविषयीही बोलायचे नाही. त्यांनी कारस्थान रचले असेल, त्यामध्ये त्यांना आनंद मिळाला असेल तर मी त्यांच्या आनंदात सहभागी आहे. माझ्या मनात कोणाविषयीही कटुता नाही, असे संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.

मी आणि माझ्या पक्षाने जे भोगायचे होते, ते भोगले आहे. माझ्या कुटुंबाने खूप काही गमावले आहे. पण मी या गोष्टींचा स्वीकारत करतो. अशा गोष्टी आयुष्यात घडतात. पण आजपर्यंतच्या इतिहासात देशाने अशाप्रकारचे सूडबुद्धीचे राजकारण कधीच पाहिले नाही, असेही संजय राऊत म्हणाले.

आपल्या देशात दुश्मनालाही चांगल्या पद्धतीने वागवले जाते. तरीही मी या सगळ्यांचा स्वीकार करतो. मी ईडी किंवा अन्य कोणत्या यंत्रणेला दोष देणार नाही. प्रत्येकाला चांगले काम करण्याची संधी मिळते, त्यांनी चांगले काम करावे, असेही संजय राऊत म्हणाले. राज्यातील सरकार बेकायदेशीर आहे, याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. राज्याचे नेतृत्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच करत आहेत. मी लवकरच त्यांची भेट घेणार आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!