भूखंड घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंच्या चौकशीसाठी भाजप आमदारच आग्रही, शिंदे गट-भाजपत सुप्त संघर्षाची ठिणगी


नागपूरः   गरिबांसाठी घरे देण्याच्या उद्देशाने संपादित केलेल्या नागपूर सुधार प्रन्यासाच्या भूखंड घोटाळाप्रकरणी विरोधी पक्षाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू असतानाच भाजप आमदारही मुख्यमंत्री शिंदेंच्या पाठीशी नसल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपच्या तीन आमदारांनी या प्रकरणी दीड महिन्यापूर्वीच तारांकित प्रश्न टाकला असून शिंदेंच्या चौकशीसाठी भाजप आमदारही आग्रही असल्याचे यावरून उघड झाले आहे. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपात सुप्त संघर्षाची ठिणगी पडल्याचे मानले जाऊ लागले आहे.

एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री असताना गरिबांसाठी घरे बांधून देण्याच्या उद्देशाने संपादित करण्यात आलेला भूखंड नागपुरातील बिल्डरला अतिशय कमी किमतीत म्हणजे अवघ्या दोन कोटी रुपयांतच बिल्डरला देण्यात आला. या भूखंडाची किंमत १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हा गंभीर आरोप केला. नागपूर सुधार प्रन्यासाच्या हरपूर येथील भूखंडाच्या वादावरून आता राज्याचे राजकारण चांगलेच पेटले आहे. याच मुद्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

 या प्रकरणात विरोधक आक्रमक झालेले असतानाच भाजपचे आमदारही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी नसल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपचे आमदार तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दटके आणि नागोराव गाणार या विदर्भातील तीन आमदारांनी या भूखंड घोटाळ्याच्या चौकशीसाठी दीड महिना आधीच ताराकिंत प्रश्न टाकला आहे.

या भूखंड घोटाळ्याच्या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चौकशी व्हावी, अशी मागणी या तीन आमदारांनी तारांकित प्रश्नाद्वारे केली आहे. अधिवेशनाआगोदरच भाजपने मुख्यमंत्र्यांच्या चौकशीसाठी नियोजनबद्ध पद्धतीने सुरू केलेले प्रयत्न आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा या प्रकरणातील सहभाग पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चौकशी झाली पाहिजे, अशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच इच्छा आहे की काय? असा सवाल आता राजकीय वर्तुळात विचारला जाऊ लागला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी शिवसेनेत उभी फूट पाडण्यात आली. महाविकास आघाडीचे सरकार पडले आणि एकनाथ शिंदेंचा गट सोबत घेऊन भाजपने सरकार स्थापन केले खरे, परंतु या सगळ्याच प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांचे डिमोशन झाले. त्यांना उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावे लागले. तेव्हापासूनच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांत सुप्त संघर्षाला सुरूवात झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत होती.

 आता भूखंड घोटाळा प्रकरणात भाजपच्याच तीन आमदारांनी चौकशीच्या मागणीसाठी तारांकित प्रश्न टाकल्याचे उघडकीस आल्यामुळे या सुप्त संघर्षावर शिक्कामोर्तब झाले आहे.  भाजप प्रदेशाध्यक्षांच्याच पुढाकाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चौकशीसाठी भाजप आमदारांनी फिल्डिंग लावल्यामुळे शिंदे गट आणि भाजपमध्ये सर्व काही आलबेल नाही, हेही स्पष्ट झाले आहे. या सुप्त संघर्षाचा राज्याच्या राजकीय स्थैर्यावर काय परिणाम होतो, हे नजीकच्या काळात पहायला मिळण्याची शक्यता आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!