चार-दोन उद्योगपतींनी देश ओरबाडायचा असा हिंदुस्तान होऊ देणार नाही: राहुल गांधी


शेगाव: दोन-तीन उद्योगपतींनी देशाचा सर्वच्या सर्व पैसा ओरबाडायचा आणि देशातील युवांच्या स्वप्नांचा चुराडा करायचा, असा हिंदुस्तान आम्हाला नको आहे. असा हिंदुस्तान आमचा नाही आणि असा हिंदुस्तान आम्ही बनूही देणार नाही, असा विश्वास काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिला.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रा आज शेगावमध्ये पोहोचली. या यात्रेदरम्यानची महाराष्ट्रातील शेवटची सभा शेगावमध्ये झाली. त्यावेळी राहुल गांधी बोलत होते.

महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराज, म. फुले, शाहू महाराज, संत ज्ञानेश्वर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे. यापैकी कोणीही द्वेष, हिंसा,तिरस्काराची भाषा केली नाही. त्यांनी प्रेमाचा, लोकांना जोडण्याचाच संदेश दिला. द्वेष, हिंसा, तिरस्कारामुळे कोणाचा फायदा झाला काय? असा सवालही राहुल गांधी यांनी उपस्थितांना विचारला.

यात्राची गरज काय? या यात्रेचा फायदा काय? असे सवाल विरोधकांनी विचारले होते . भाजपने देशाच्या कानाकोपऱ्यात भय, द्वेष, हिंसा पसरवली. त्याविरोधात ही यात्रा आहे.

या यात्रेचा उद्देश तुम्हाला काही सांगण्याचा नाही. आमच्या ‘मन की बात’ तुमच्यासमोर ठेवण्याचा नाही. तर तुम्हाला भेटणे आणि तुमचे ऐकून घेणे हा या यात्रेचा उद्देश आहे. लोकांना भेटल्याने, लोकांशी बोलल्याने प्रेम वाढते. द्वेष, तिरस्कार आणि हिंसेने देश तुटतो.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, देशाचे प्रधानमंत्री राज्यातील शेतकऱ्यांशी बोलले तर एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले. महाराष्ट्राच्या जनतेने मला जे प्रेम दिले, जे ज्ञान दिले ते आयुष्यभर विसरू शकणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!